अकोला दिव्य न्यूज : राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करून अकोला शहरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ना. शिंदे यांनी दिली. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, युवासेना सचिव विठ्ठल सरप पाटील व अकोला महानगरप्रमुख योगेश अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची नागपूर येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

अकोला शहरातील वर्तमान राजकीय परिस्थिती, संघटनेची ताकद, शिवसैनिकांच्या भावना आणि आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. नगर विकास खात्यामार्फत अकोला शहराला मिळालेल्या निधीची माहिती देण्यात आली. निवडणुकीपूर्व तयारी, संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवणे आणि जनतेचा विश्वास दृढ करणे या सर्व मुद्द्यांचा सखोल व मनमोकळेपणाने आढावा यावेळी घेण्यात आला.
शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांची अकोला जिल्हा संपर्कप्रमुखपदी केलेली नियुक्ती अकोल्यातील शिवसैनिकांसाठी नवी ताकद देणार आहे. हा निर्णय अकोल्याच्या राजकीय समीकरणात निर्णायक ठरणार असून,या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.
