अकोला दिव्य न्यूज : पावसाळ्यानंतर जमीन मोजणीच्या कामांसाठी अकोला जिल्ह्यातील अर्जदारांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी गठीत पथकाकडून मोजणीचे कामे पूर्ण करण्याची मोहीम अकोला भूमी अभिलेख विभागाकडून राबवून 103 मोजणी प्रकरणाची मोजणी कार्यवाही करून त्यापैकी 90 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

भूमी अभिलेख विभागाकडे शेती मोजणीसाठी अर्ज दाखल केले जातात. त्यांच्या पसंतीनुसार तीन प्रकारचे शुल्क अर्जदारांकडून जमा करून घेतले जाते. त्या अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेतून मोजणीची तारीखही दिली जाते. साधारणता ऑक्टोबरनंतर पाऊस थांबतो. या महिन्यापासून मोजणी प्रक्रियेला सुरुवात केली जाते. मात्र, यंदा पावसाळासंपल्यानंतरही गेल्या अनेक दिवसांपासून कधी परतीचा तर कधी वादळी पाऊस सुरूच आहे.

आधी अर्ज केलेल्यांना दिलेल्या तारखेच्या दिवशी पावसामुळे मोजणी करता आली नाही. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडे मोजणीसाठी प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली. ती निकाली काढण्यासाठी विभागाने आता विशेष मोहीम नियोजित केली आहे.
या मोहीम अंतर्गत प्रलंबित 103 मोजणी प्रकरणाची मोजणी कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी 90 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. अकोला जिल्हा अधीक्षक भारती खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यातील उपअधीक्षक पालवे, सोळंके आणि बिहाडे यांच्यासह अकोला जिल्ह्यातील 71 मोजणी कर्मचारी कार्यरत होते. विशेष म्हणजे या सगळ्या मोहिमेत भूमी अभिलेख विभागातील निरीक्षकांसोबतच कार्यालयातील कनिष्ठ लिपिक, शिरस्तेदार तसेच मुख्यालय सहायक सुध्दा सहभागी झाले होते.

