अकोला दिव्य न्यूज : कौशल्य शिक्षणाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जागृती निर्माण करणे, तसेच भारत सरकारच्या कौशल्याधारित उपक्रमांचा प्रसारासाठी देशभरात कार्यरत लॅंड–ए–हॅंड इंडिया’ या संस्थेने अकोला खडकी येथील पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालयातील बी.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी अवंती गजानन हरणे हिची ‘स्किल ऑन व्हील’ फेलोशिपसाठी निवड करण्यात आली.

पुणे येथील कर्वे समाजकार्य महाविद्यालयातून एम.एस.डब्ल्यू. पदवी प्राप्त अवंती गजानन हरणे हिने आपल्या यशात भर घातली आहे. शिक्षणातील गुणवत्ता, कौशल्याधारित दृष्टीकोन आणि विद्यार्थीदशेपासून केलेल्या समाजाभिमुख कार्याचा उल्लेखनीय ठसा उमटवत तिने महाविद्यालयीन कॅम्पस मुलाखतीत प्रथम क्रमांक पटकावला.
हिमाचल प्रदेश समग्र शिक्षण अंतर्गत संस्थेच्या वतीने राज्यातील शाळांमध्ये विविध शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि कौशल्यवर्धन उपक्रम सातत्याने राबवले जातात. युवा पिढीला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘स्किल ऑन व्हील’ या अभिनव उपक्रमासाठी यावर्षी अवंती हरणे हिची निवड झाली आहे. अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध समाजसेवक गजानन हरणे यांची अवंती मुलगी आहे. या निवडीबद्दल अकोला जिल्ह्याचे तसेच महाविद्यालयांचा गौरव वाढला असून, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अवंती हरणे हिचे अभिनंदन केले असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

