अकोला दिव्य न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या प्रवक्ते पदासाठी नवी यादी जाहीर केली असून 17 नावांच्या या यादीतून आमदार अमोल मिटकरी यांच नावे गायब आहेत. त्यामुळे प्रवक्तापदावरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केल्याचं दिसून येत आहे. आता, पक्षाच्या प्रवक्ते पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी एका शायरीतून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावरील भूमिका काहीवेळा पक्षासाठी व महायुतीसाठी अडचणीची ठरल्याने त्यांना आपल्या भूमिकेतून माघारही घ्यावी लागली आहे. अमोल मिटकरी यांनी शायरीतील दोन ओळीतून आपली भूमिका मांडली आहे.
अमोल मिटकरी यांची वादग्रस्त ठरलेली भूमिका
आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करताना केलेल्या काही वक्तव्यांवरुन आणि सोशल मीडियातील भूमिकांवरुन वाद झाला होता. अमोल मिटकरी प्रवक्ता म्हणून पक्ष नेतृत्वाची भूमिका मांडण्या ऐवजी आपल्या मनातील मळमळ ओकत होते. यामुळे महायुतीमध्ये अनेकदा वादाची ठिणगी पडत होती. विशेष म्हणजे भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाव न घेता वाचाळवीरांना पक्ष नेतृत्वाने समज द्यावी, पक्ष नेतृत्वाचे त्यांनी ऐकावे, असे म्हणत एकप्रकारे मिटकरींनाच सल्ला दिला होता.

अलिकडेच आयपीएस अंजना कृष्णा यांच्या जातपडताळणीची मागणी करणारे ट्विट केलं होतं, ते पक्षाच्या दबावामुळे त्यांना डिलीट करावं लागलं. तसेच, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पाठिंबा दर्शवणारे ट्विट केलं आणि पक्षातून नाराजी व्यक्त केल्यानंतर तेही ट्विट त्यांनी डिलीट केलं आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मिडियाचं मॅनेजमेंट करणाऱ्या डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून आपणच निवडणूक जिंकून आणली अशा प्रकारे ट्विट लिहिलं आहे, असं आक्षेप घेणारे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाला होता. याशिवाय, महायुतीमधे असताना आपण रावणाचं मंदिर बांधणार असल्याची घोषणा अमोल मिटकरी यांनी केली होती, त्यावरूनही महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावरून भाजपला सवाल विचारणारे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं होतं.

अमोल मिटकरी यांच्या मनमाफक भूमिकेमुळे अजित पवार यांची अनेकदा गोची झाली होती. अखेर अजितदादांनी बडगा उगारला.
