अकोला दिव्य न्यूज : अकोल्याहून सहलीसाठी गेलेल्या शॉरवीन क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांवर दुर्दैवी प्रसंग ओढवून समुद्रातील अचानक आलेल्या प्रचंड लाटेत तिघेजण वाहून गेले. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

या घटनेत उमरी भागातील वृंदावन नगरचे रहिवासी व शिक्षक राम विठ्ठल कुटे (वय 60) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (वय 19) यांचा मृत्यू झाला. तर टीटीएन कॉलेजचा विद्यार्थी आयुष बोबडे (वय 17) याला स्थानिकांनी वाचवले असून त्याच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉरवीन क्लासेसचे १५ जण सहलीसाठी रायगड जिल्ह्यात आले होते. सर्वजण 5 नोव्हेंबर रोजी अकोल्याहून निघाले आणि 7 नोव्हेंबरला अलिबाग येथे पोहोचले. शनिवारी दुपारी हा गट मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी गेला. काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र पोहताना आयुष रामटेके, आयुष बोबडे आणि शिक्षक राम कुटे यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेत आत ओढले गेले. स्थानिकांनी तत्परतेने मदत केली, परंतु दुर्दैवाने दोन जणांचा जीव वाचवता आला नाही.

राम कुटे यांचा मृतदेह अलिबाग जिल्हा रुग्णालयात तर आयुष रामटेके याचा मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयुष बोबडे हा विद्यार्थी स्थानिकांच्या मदतीमुळे वाचला. त्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे अकोला आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांत शोककळा पसरली आहे.

स्थानिक प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षारक्षक नेमले असून पर्यटकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. सहलींच्या सुरुवातीच्या हंगामातच घडलेल्या या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

