अकोला दिव्य न्यूज : सर्वसामान्य माणसाला कायद्याने दिलासा व न्याय मिळवून देणे आणि सामाजिक सलोखा आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुंड व बदमाशांवर पोलिसांचा जरब ठेवणं पोलिसांचं कर्तव्य आहे.पण चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याच्या वृत्तीने पोलिसांचा कारभार सुरू असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. तर पोलिस खात्यात लाचखोरी जणू काही कर्तव्याचाच एक भाग आहे, अशा पध्दतीने सरेआम पैसे घेण्याची वृत्ती एवढी वाढली की चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. हे कटू सत्य असून अकोला पोलिस दलात चाललेल्या भ्रष्टाचार व लाचखोरीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पाळेमुळे घट्ट केले आहे.

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या केबिनला लागूनच असलेल्या आस्थापना विभागातील लाचखोर महिलेला अमरावती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ‘लाचखोरी’ करीत असताना रंगेहाथ पकडून लाचखोरीवर “शिक्कामोर्तब” केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात लाचखोरीच्या प्रकरणांत रंगेहाथ पकडण्यात आलेली लाचखोर महिला कर्मचारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना विभागात वरिष्ठ लिपीक ममता संजय पाटील (५० वर्षे) असून मुळची बुलडाणा येथील चिखली रोड येथील वृंदावन नगराची आहे.
अमरावती एसीबीकडे प्राप्त तक्रारीनुसार यातील तकारदार हे धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचेकडे कमिशन पद्धतीने काम करणारा कैलास ओमप्रकाश अग्रवाल यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये तक्रारदार यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या वेअर हाउस मधील धान्य विकुन तक्रारदाराची फसवणूक केली होती. त्यावरून पो.स्टे. रामदास पेठ, अकोला येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन रामदास पेठ तसेच गुन्हे शाखा अकोला यांचेकडे असुन सदर गुन्ह्यात तपास अधिका-यांनी आरोपी कैलास अग्रवाल यांना मदत केल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. असे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सदर गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांनी आरोपीस मदत केल्याने त्यांना जामीन मिळाला आहे. म्हणून सदर अधिका-यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी. अशा आशयाचा तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक, कार्यालय अकोला येथे दिला होता.
सदर अर्जाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करुन अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविला आहे. सदर अहवालावर नोटशीट तयार करुन वरिष्ठांना सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपीक ममता संजय पाटील यांनी तक्रारदार यांना २०,००० रुपये लाचेची मागणी करुन नोटशीट सादर करण्यापुर्वी १०,००० रुपये व नोटशीट सदर केल्यावर १०००० रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करीत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती कार्यालय येथे दिली होती.

तक्रारदाराच्या सदर तक्रारीवर कारवाई करण्यासाठी एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने गुरुवार दि.६/११/२०२५ रोजी तक्रारीची सत्यता पडताळणी कारवाई केली असता तक्रारदार यांच्या अर्जानुसार अपर पोलीस अधीक्षक, अकोला यांनी दिलेला अहवाल पोलीस अधीक्षक, कार्यालय येथे पाठविला आहे. सदर अहवालावर नोटशिट सादर करण्यापुर्वी ममता संजय पाटील यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती ८,००० रुपये लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केल्याने लगेच लावण्यात आलेल्या सापळ्यात पंचासमक्ष तक्रारदारा कडून लाचेची रक्कम स्विकारली असता ममता संजय पाटील यांस रंगेहाथ पकडून ताब्यात घेऊन लाचखोर महिला कर्मचाऱ्याविरुद्ध पो.स्टे. खदान, अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
