अकोला दिव्य न्यूज : अकोल्याचे सुपुत्र प्रवीण हटकर यांनी लिहिलेले ‘अहं शून्य’ हे पुस्तक जागतिक स्तरावर आपली छाप सोडत आहे. अहंकार या विषयावर अभंगरूपात साकारलेले हे अद्वितीय पुस्तक लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले जात असून, ही अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

‘अहं शून्य’ या ग्रंथामध्ये एकूण ३९० अभंग चरण आहेत. या अभंगांद्वारे मानवी जीवनातील सर्वांत सूक्ष्म पण घातक घटक असलेल्या अहंकाराच्या विषापासून मुक्त होण्यासाठीचा मार्ग लेखकाने प्रभावीपणे दाखवून दिला आहे. प्रत्येक अभंगात आत्मचिंतन, अध्यात्म आणि साधनेचा संदेश अंतर्भूत आहे.

अभंगरूपात अहंकार विषयावर इतक्या विस्तृत प्रमाणात विवेचन करणारे हे जगातील एकमेव पुस्तक ठरत असून, त्यामुळेच या ग्रंथाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
साहित्य, अध्यात्म आणि सामाजिक क्षेत्रातून हटकर यांच्या या कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. ‘अहं शून्य’ हा ग्रंथ अनेकांना आत्मपरिचय आणि अहंकारमुक्त जीवनाचा संदेश देणारा ठरतो आहे. 23 नोव्हेंबर 2025 पुणे येथे हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
