अकोला दिव्य न्यूज : ‘सकल मराठा’ समाजाच्या एकत्रिकरणासाठी पाटील समाजाने पुढाकार घेतल्याचे दिसत असून त्याकरिता सभा व बैठकांचे आयोजन सुरू केले आहे. महाराष्ट्रात ‘एक मराठा, लाख मराठा’ हे घोषवाक्य चांगलेच लोकप्रिय झालेले आहे. परंतु ‘एक मराठा’ म्हणजे नेमका कोणता मराठा ? हा प्रश्न आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा ठरत आहे. पाटील, देशमुख ही जात नसून त्या त्या काळात पूर्वजांना मिळालेल्या पदव्या आहेत. आणि त्या परंपरेनुसार आजही चालत आहेत.

आज त्या पदव्यांचीच आडनावे होऊन बसलेली आहेत. यातील प्रत्येकाच्या पूर्वजांचा व्यवसाय हा शेतीचाच. शेतातील मातीचा कण आणि त्या कणात पेरले जाणारे ‘बी’ या दोघांच्या एकीतून ‘कुणबी’ तयार होऊन नंतर त्याचे कुणबी झाले. दख्खन भागातील ‘दखनी’ झालेत तर चढ उताराच्या घाटावर जमिनी कसणारे ‘घाटोळे’झालेत. शेवटी या वेगवेगळ्या फांद्यांचे मूळ खोड एकच, ते म्हणजे मराठा. परंतु याचा साफ विसर पडून आज वेगवेगळे गट तट तयार झाले आहेत.
सर्व गट तट असेच फोफावत राहिले तर भविष्यात मराठा समाजाची मोठी हानी होऊन त्यांची राजकीय व सामाजिक शक्ती कमजोर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समाजाची ही मोठी क्षती लक्षात घेऊन हे विखुरलेले सर्व गट तट एकत्रित आणून एक बळकट मराठा समाज निर्माण करण्यासाठी पाटील समाज अकोला चे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचे नेतृत्वात पुढाकार घेऊन सभा, बैठकांचे आयोजन सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेस अनुसरून मराठा समाजातील सर्व घटकांची एक सभा हॉटेल हर्षवर्धन येथे संपन्न झाली. या सभेत प्रारंभी पाटील समाजाचे सचिव खाडे यांनी ही मोहीम टप्प्या टप्प्याने कशी राबवावयाची आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. यातील एक टप्पा म्हणजे दरवर्षी वधू वर परिचय मेळाव्यांचे निमित्ताने मुला मुलींच्या परिचय पत्रांचे जे विविध पुस्तके निघतात त्या सर्व पुस्तकांचे एकत्रीकरण करून एकच पुस्तक काढता येईल काय ? याबाबतही प्रयत्न सुरू झाले आहेत.
या महत्त्वपूर्ण मोहिमेसाठी झालेल्या सभेत पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव, सचिव प्रदीप खाडे, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, विजय मालोकार, सुभाषराव म्हैसणे, नारायणराव बारड, सहदेव शिंदे, वैशाली बाहाकर, विनायकराव शेळके, रवी पाटील अरबट, अविनाश पाटील, विजय बोरकर, दिनकरराव सरप, संदीप महल्ले पाटील, गजाननराव इंगळे, सुरेश महल्ले, योगेश थोरात, देवेंद्र कुमार ताले, सुधाकर वानखडे, निवृत्ती पारसकर, साहेबराव काळंके, सुरेश गाढे पाटील, रामेश्वर सपकाळ, श्रीकृष्ण माळी, मधुकर महल्ले, विठ्ठलराव गाढे पाटील, ज्ञानदेव वनारे, वसंत पोहरे, विनायकराव गावंडे, प्रा. दत्तात्रय भाकरे, सुरेश महल्ले, प्रा. विनायक धोरण, वसंतराव माळी, संजय इंगळे, विकेश दांडगे, प्रा. गणपत सुरळकर, ऍड. डॉ. बबन कदम, तुषार जायले, ऍड. संतोष गोळे, डॉ. दयानंद पावशे, शैलेंद्र काळे यांच्यासह इतरही समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सभेत उपस्थित अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून या मोहिमेस आपला पाठिंबा दर्शविला. सभेचे संचालन प्रदीप खाडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय बोरकर यांनी केले.
