अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण महाराष्ट्रात एक मानाचे स्थान निर्माण केलेल्या ‘विश्वास करंडक’ बाल नाट्य महोत्सवाचे येत्या 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 25 या कालावधीत करण्यात येत आहे. प्रमिलाताई ओक हॉल येथे सादर होणाऱ्या महोत्सवात एकूण 36 शाळांमधील 36 नाटकांचा सहभाग राहणार आहे. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक जे.आर.डी. टाटा स्कूल खडकी अकोला येथे आयोजनात सहभागी असणाऱ्यांची एक सभा घेण्यात आली. सभेत महोत्सवाचे निमंत्रक प्रशांत गावंडे व महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधु जाधव यांनी माहिती दिली.

मागील 7 वर्षांपासून जे.आर.डी. टाटा स्कुल अँड एज्युकेशन लॅब महोत्सवाचे आयोजन भारदस्त व यशस्वीपणे करीत आहे. महाराष्ट्राच्या नाट्य क्षेत्रातील अतिशय प्रतिभावंत व्यक्ती या महोत्सवात परीक्षक म्हणून उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाल नाट्य महोत्सव म्हणून या स्पर्धेने नावलौकिक मिळविला आहे. यावर्षी काही नाविन्यपूर्ण बदलांसह हा महोत्सव सादर करण्यात येणार आहे. या बदलाचाच एक भाग म्हणून महोत्सवाचे उद्घाटन मागील वर्षाच्या उत्कृष्ट बालकलावंताच्या हस्ते करण्यात येईल.
या महोत्सवाचे निमंत्रक म्हणून प्रशांत गावंडे, महोत्सव प्रमुख म्हणून प्रा. मधु जाधव, प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रदीप खाडे काम बघत आहेत. महोत्सवाचे आयोजक प्रदीप अवचार यांची यावर्षीपासून महोत्सवाचे सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सभेत आयोजन मंडळातील अशोक ढेरे, निलेश गाडगे, अनिल कुलकर्णी, विष्णू निंबाळकर, संदीप शेवलकर, बाल कलावंत राघव गाडगे, गीताबाली उनवणे, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, रितेश महल्ले, अंकुश इंगळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

