अकोला दिव्य न्यूज : भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या अमर गीताला ३१ ऑक्टोबर २०२५ (तिथीनुसार) व ७ नोव्हेंबर २०२५ (तारखेनुसार) १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभर ‘वंदे मातरम् सप्ताह’ साजरा केला जात आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे यांनी ‘वंदे मातरम्’ विषयक एक आकर्षक आणि शैक्षणिक प्रदर्शन तयार केले आहे. हे प्रदर्शन अकोल्यातील शाळांना निलेश देव मित्र मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आले.
या प्रदर्शनात ‘वंदे मातरम्’ गीताचा इतिहास, त्यामागील राष्ट्रीय भावना, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे योगदान तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या गीताने निर्माण केलेली जनजागृती याचे सजीव दर्शन घडते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, मातृभूमीप्रेम आणि भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान जागवणारे हे प्रदर्शन माहितीपूर्ण, भावनिक आणि प्रेरणादायी ठरले आहे.

या उपक्रमाद्वारे निलेश देव मित्र मंडळाने राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे यांच्या सामाजिक प्रयत्नांना हातभार लावत अकोल्यातील विद्यार्थ्यांपर्यंत ‘वंदे मातरम्’ ची प्रेरणा पोहोचवली आहे.
सर्वांनी या गीतामागील संस्कार पुन्हा अंतःकरणात दुमदुमू देऊया
