अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते किसनराव हुंडिवाले यांच्या हत्या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद उद्या सोमवार ३ नोव्हेंबर २०२५ पासून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होतं आहे. या प्रकरणात राज्य सरकारकडून नियुक्त विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम सरकार पक्षातर्फे युक्तीवाद करणार आहेत. त्यांना जिल्हा सरकारी वकील राजेश्वर देशपांडे व अँड.नरेंद्र धूत सहकार्य करणार आहेत.

कौलखेड येथील शैक्षणिक संस्थेच्या वादातून हुंडीवाले व गावंडे कुटुंबियांमध्ये वाद सुरू होते. हा वाद विकोपाला जाऊन अकोला येथील चॅरिटी कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या करण्यात आली. सदर प्रकरणाचे गांभीर्य पाहून शासनाने या हत्याकांड प्रकरणात शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. हत्याकांडाचे प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या न्यायालयात सुरू आहे. आजपर्यंत झालेल्या सुनावणीत हुंडीवाले यांची हत्या केलेल्या लोखंडी खुर्च्याचे तुटलेले ३२ तुकडे, आग विझविण्याचे यंत्र अर्थात लहान फायर सिलिंडर, लोखंडी टोचा, कुबडी याबाबत निरीक्षण नोंदविले.

दरम्यान हुंडीवाले यांची ज्या डॉक्टरानी उत्तरीय तपासणी अर्थात ‘पीएम’ केले, त्यांची साक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आली. ही साक्ष दोन दिवस चालली होती.सदर हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाने अतिरिक्त दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यावर बचाव पक्षाच्या विधिज्ञांनी आक्षेप घेतला होता.तर सरकार पक्षाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले आणि गेल्या सुनावणीवेळी हत्याकांड प्रकरणातील दाखल केलेले अतिरिक्त दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने मान्य केल्याची माहिती आहे.
किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाची माहिती न्यायालयात साक्षच्या माध्यमातून व्यवस्थित दिली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात सरकार पक्षाची अभ्यासपूर्ण बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील आर. आर. देशपांडे यांनी सहकार्य केले. आता सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून उद्या सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
