Sunday, November 2, 2025
No menu items!
No menu items!
Homeसावध व्हा ! ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही...

सावध व्हा ! ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला

अकोला दिव्य न्यूज : सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट, डिजिटल अरेस्ट यामाध्यमातून फसवणूकीचा धोका कायम असता व्हॉट्सॲप हॅकिंग, सिम स्वॅपपाठोपाठ आता कॉल मर्जिंग स्कॅमचा नवा धोका समोर आला आहे. हे गुन्हेगार मोबाइलवरील ‘कॉल मर्ज फीचर’चा गैरवापर करून ओटीपी मिळवतात आणि पैसे चोरतात. त्यामुळे यापासून सावध राहण्याचा इशारा महाराष्ट्र सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिला.

कसा हाेताे कॉल मर्जिंग स्कॅम ? : तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल येतो. कॉल करणारी व्यक्ती विश्वास संपादन करते आणि दुसरा कॉल मर्ज करण्यास सांगतो. दुसरा कॉल हा ओटीपी कॉल असतो. स्कॅमर शांतपणे ओटीपी ऐकतो. व्यवहार पूर्ण होतो आणि पैसे चोरीला जातात. महत्त्वाचे म्हणजे स्कॅमरकडे आधीच तुमची बँक माहिती असते. ओटीपी मिळवण्यासाठीच कॉल मर्जची युक्ती वापरली जाते.

व्हॉट्सॲप हॅकिंग… सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते गुगल व्हेरिफिकेशन कोड किंवा ओटीपी मागतात. तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सामील होणे किंवा ओळख पटवणे अशा कारणे ते देतात.. कोड मिळाल्यावर ते पीडिताचा नंबर वापरून व्हाॅट्सॲप स्वतःच्या मोबाइलवर इन्स्टॉल करतात आणि चॅट्स व संपर्क यादीवर ताबा मिळवतात.

अकाउंट ताब्यात घेतल्यावर हे गुन्हेगार पीडिताच्या मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना मेसेज पाठवतात. अनेक वेळा व्यवसायातील कर्मचारी मालक किंवा वरिष्ठ अधिकारी असल्याचा भासवणारा मेसेज मिळवतात आणि तातडीने पैसे किंवा गोपनीय माहिती घेत फसवणूक करतात.

बँक कधीही फोनवर ओटीपी किंवा पिन विचारत नाही. कॉल मर्ज करण्याची विनंती म्हणजे स्कॅमचा इशारा आहे. सतर्क राहा. माहिती द्या – संजय शिंत्रे, पोलिस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई

स्कॅमर तुमची माहिती कशी मिळवतात? : डेटा लिक, फिशिंग वेबसाइट्स, मालिशियस ॲप्स, प्रतिरूप कॉल्स ही माहिती वापरून ते कॉल मर्ज करायला लावतात आणि ओटीपी चोरतात.

धोका ओळखण्याची लक्षणे : अचानक नेटवर्क बंद होणे, ओटीपी/एसएमएस येणे थांबणे, यूपीआय ॲप्समध्ये पुन्हा लॉगिन करण्याची सूचना, किंवा नवीन सिम ॲक्टिव्हेशनची सूचना ही सर्व फसवणुकीची लक्षणे आहेत.

१९३० राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन
येथे तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in

येथे तक्रार नोंदवा
आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधा.

काय करावे ? :  अनोळखी कॉलसोबत दुसरा कॉल मर्ज करू नका. कॉल कट करून अधिकृत नंबरवरून ओळख पडताळा. फक्त अधिकृत ॲप्स वापरा, अनावश्यक परवानग्या नाकाराव्यात. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. ओटीपी, पिन, सिव्हिव्ही क्रमांक कोणालाही शेअर करू नका.

सिम स्वॅप कशी होते? 

सिम स्वॅप फसवणुकीत फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे वापरून नवीन सिम मिळवतात. मूळ सिम बंद झाल्यावर ओटीपी आणि संदेश फसवणूक करणाऱ्याला मिळतात, आणि बँक, यूपीआय, ई-मेल, सोशल मीडिया खात्यांमध्ये प्रवेश मिळतो. फिशिंग कॉल्स, बनावट केवायसी/नोकरी अर्ज, डार्क वेबवरील लिक डेटाबेस, सोशल मीडिया प्रोफाइल आणि बनावट ॲप्सद्वारे सायबर गुन्हेगार पीडितांची माहिती गोळा करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!