अकोला दिव्य न्यूज : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. बच्चू कडू यांनी सरकारला शेतकरी कर्जमाफीसाठी अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आज संपला आहे. त्यामुळे आज बच्चू कडू काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. नागपुरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा निघाला आहे. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळत आहे. या मोर्चामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग बंद पडला आहे. या मोर्चावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांवर अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला.

महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वर्जमुठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की, समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद-जबलपूर मार्ग बंद सगळे रस्ते बंद केले आहेत. बच्चू कडू यांनी फार सर्वेक्षण केलेलं आहे. कारण इथून एकही गाडी पास होणार नाही. सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही”, असं रविकांत तुपकर म्हणाले.
तुकड्या तुकड्यात लढण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली सगळ्यांची ताकद मोठी होईल. आज सोयाबीन साडेतीन ते चार हजार रुपयांनी विकलं जात आहे. सोयाबीनचं एक क्विंटल उत्पादनासाठी साडे सात हजार रुपये खर्च येतो आणि बाजारात तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे. कापसाची देखील तीच अवस्था आहे, अशी खंत तुपकर यांनी व्यक्त केली.
जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येतं. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? हा आमचा सरकारला सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाहीत. तुम्हाला चर्चा करायला शेतकऱ्यांच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावं लागेल”, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की, बैठक बोलावली होती पण चर्चेला आले नाहीत. अरे विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष झालं. पण तुम्ही कर्जमुक्ती केली नाही. आम्ही भीक मागायला आलो नाहीत. सोयाबीनला भाव देता येत नाही. सोयाबीन निर्यात होत नाही. परदेशात निर्यात करा. सोयाबीनचे योग्य भाव मिळतील. कापसाची आयात करण्यापेक्षा निर्यात करा. कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे, असं तुपकर म्हणाले.
अरे हरामखोरांना…’
अरे हरामखोरांना तुमच्या भवनामुळे आमच्यावर कर्ज झालं. आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाही. सोयाबीनमध्ये लुटलं. कापसात लुटलं, ऊसात लुटलं म्हणून आम्ही कर्जाबाजारी झालो. त्यामुळे कर्जमुक्तीचा आम्हाला नैतिक अधिकार आहे, असं ते ठामपणे म्हणाले.
