अकोला दिव्य न्यूज : पाटील समाजात जास्त प्रमाणात होत असलेल्या घटस्फोट प्रकरणांवर चिंता व्यक्त करण्यात येऊन त्यावर उपाय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. घटस्फोटाच्या सीमेवर येऊन पोहोचलेल्या पती-पत्नीत समेट घडवून त्यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी ‘विश्वास’ नामक एका कक्षाची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच सकल मराठा समाजातील मराठा, पाटील, कुणबी, देशमुख, घाटोळे पाटील यांचे एकत्रीकरण करून त्यांच्यात विवाह कसे जुळविता येतील यावर चर्चा होऊन यासाठी अशोकराव अमानकर, प्रदीप खाडे, राम मुळे यांची एक त्रीसदस्य समिती तयार करण्यात आली आहे.

हॉटेल हर्षवर्धन येथे संपन्न झालेल्या पाटील समाजाच्या एका सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेच्या प्रारंभी पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांनी प्रास्ताविकात येत्या 7 डिसेंबर 2025 रोजी पाटील समाज अकोलातर्फे उपवर मुला मुलींचा योगायोग परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड कौलखेड अकोला येथे आयोजित करण्यात आलेला हा भव्य मेळावा सकाळी 11 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी सकाळी 9:30 ते 11 या वेळात उपवर मुला मुलींची नोंदणी करता येईल.अशी माहिती देताना मेळावा आयोजनाचा हेतू विशद केला. आजच्या सभेत प्रामुख्याने पाटील समाजात जास्त प्रमाणात होत असलेल्या घटस्फोट प्रकरणांवर चिंता व्यक्त करण्यात येऊन त्यावर उपाय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या विविध वधू वर परिचय मेळाव्याची एकत्रित परिचय पुस्तिका छापता येईल काय ? यावरही विचार विमर्श करण्यात आला. या सर्व योजना सफल करण्यासाठी तालुकास्तरावर बैठका घेऊन त्यात मार्गदर्शन करण्याचे या सभेत ठरविण्यात आले.
पाटील समाजातर्फे 7 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी न्यू अनंत मेडिकल स्टोअर्स रतनलाल प्लॉट अकोला व जानोरकर मंगल कार्यालय अकोला येथे सुद्धा आज पासूनच उपवर मुला मुलींची नोंदणी करता येणार आहे.

या सभेत पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, सचिव प्रदीप खाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, सहसचिव विजय बोरकर, रवी पाटील अरबट, पंकज साबळे, अविनाश पाटील, राम मुळे, संदीप पाटील महल्ले, शरद वानखडे, गजानन इंगळे, विठ्ठल गाढे पाटील, गजानन हरणे, डॉ. दिलीप मानकर, देवेंद्र ताले, योगेश थोरात, दिनकरराव सरप, साहेबराव काळंके, प्रा. वसंतराव गावंडे, निवृत्ती पारसकर, अतुल भुयार, श्याम कुलट, शैलेंद्र काळे यांचे सह इतरही सदस्य उपस्थित होते. सभेचे संचालन प्रदीप खाडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय बोरकर यांनी केले.
मेळाव्यात समाजातील नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आपल्या उपवर मुला-मुलींना या मेळाव्यात सहभागी करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे
