Sunday, November 2, 2025
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातही मतदार यादीत प्रचंड घोळ ! आधी Update करा नंतर निवडणूक घ्यावी

अकोल्यातही मतदार यादीत प्रचंड घोळ ! आधी Update करा नंतर निवडणूक घ्यावी

अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील मतदार यादीत हजारो दुबार नावे आढळल्याने प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतदार यादीतील घोळसंदर्भात तक्रार नोंदवली. मतदार यादी घोळ दूर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील केंद्र क्रमांक १६३, १६४, १६५, १८३, १८४, १८५, १९४, ११८, १८२ आणि २०३ यामध्ये सुमारे एक हजार ४०० दुबार नावे असल्याचा दावा मनसेने तक्रारीत केला. प्रभाग क्रमांक १५ मधील केंद्र क्रमांक २६१ ते २७४ मध्ये सुमारे एक हजार २०० दुबार नावे आढळल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. या दुबार नावांमुळे मतदार यादीची विश्वासार्हता धोक्यात आली असून, काही मतदारांना मतदानाचा मूलभूत अधिकार मिळण्यात अडथळा येऊ शकतो. याचा थेट परिणाम निवडणूक प्रक्रियेवर होईल. अनियमिततेची शक्यता वाढेल. मतदार यादीची शुद्धता राखणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

दुबार नावांची तत्काळ तपासणी करून अनावश्यक नावे मतदार यादीतून वगळावीत, सुधारित मतदार यादीची प्रत तत्काळ उपलब्ध करावी, या प्रक्रियेच्या पाठपुराव्याची माहिती देण्यात यावी, सर्व मतदार याद्या यंत्रणेमार्फत अद्ययावत करण्यात याव्यात आदी मागण्या देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, अकोला शहराध्यक्ष सौरभ भगत आणि मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी संयुक्तपणे ही तक्रार जिल्हा निवडणूक विभागाकडे सादर केली.

जिल्ह्यातील मतदार यादीत हा घोळ निवडणूक यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. हजारो दुबार नावांमुळे खऱ्या मतदार आपल्या अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. पुराव्यासह तक्रार दाखल केली असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी. अन्यथा मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा पंकज साबळे यांनी दिला. शहरातील मतदान केंद्रावरील याद्यांचा घोळ केवळ नमुने आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अशी स्थिती आहे. आयोगाने हे गांभीर्याने घ्यावे, असे मत सौरभ भगत यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!