अकोला दिव्य न्यूज : रिझर्व्ह बँकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या १ तासात चेक क्लिअरींगचा निर्णयाचा बोजवारा उडाला आहे. तब्बल १५ दिवसाचा कालावधी उलटून गेला असतानाही खातेदाराचे लाखों रुपये अडकून पडले आहेत.अकोला शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील खातेदारांची प्रचंड आर्थिक कुचंबणा होत असून सर्व संबंधितांना वारंवार तोंडी, लेखी व सांगून, वरिष्ठांना मेल पाठवून देखील क्लिअरिंगसाठी दिलेल्या धनादेशाची रक्कम संबंधित खात्यात जमा झाली नाही. विचारना केली तर चेक ‘सिस्टीम’ मध्ये असल्याचे साचेबद्ध उत्तर दिले जाते. सामान्य कर्जदारांकडून पै ना पै वसूल करणारी स्टेट बँक आता खातेदाराची कुठलीही चुक नसताना या उशीराने मिळणाऱ्या लाखो रुपयांवरील व्याजाची भरपाई देणे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार बंधनकारक नाही का ?

स्टेट बँक ऑफ इंडिया अकोला मुख्य शाखेतील खातेदार मनोहरराव हरणे यांनी २८ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतील खाते क्रमांक १११२५०८७८५४ मध्ये अकोला येथीलच पंजाब नॅशनल बॅकेचा अकोला तिलक रोड शाखेचा चेक क्रमांक 948539 जमा केला. बॅकेकडून काही त्रुटी काढून चेक परत केला गेला. तेव्हा सदर त्रुटीची पुर्तता करुन दिनांक ७ नोव्हेंबर २५ रोजी पुन्हा जमा करण्यात आला. परंतु काल २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सदर चेकची लाखो रूपयांची रक्कम हरणे यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
दरम्यान हरणे यांनी चार वेळा सदर संदर्भात संबंधितांकडे विचारणा केली. तेव्हा एक-दोन दिवसात जमा होईल. नवीन सिस्टीम मध्ये अडचणी येत आहेत. असे उत्तर दिले गेले. मात्र १० दिवसाचा कालावधी उलटून गेला. तेव्हा मनोहर हरणे यांनी २० नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्य व्यवस्थापक यांना ईमेल केला. परंतु आजपर्यंत त्या इमेलवर उत्तर दिले गेले नाही. कुठल्याही पुर्वतयारी शिवाय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास सर्वच बॅंकेतील खातेदार हकनाक आर्थिक संकटात सापडला आहे. लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून व्यापारी व उद्योजक हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे काही व्यापारी संघटना सत्ता पक्षाला समर्पित असल्याने केवळ पत्रक काढून मोकळे होतात.
याविरोधात ठोस उपाययोजना करण्यासाठी रस्त्यावर येऊन निषेध का केला जात नाही, अशी व्यापारी व नागरिक करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बॅंकेत १५-१५ दिवस चेक क्लिअर होतं नाही तर इतर बॅंकेतील खातेदारांची अवस्था काय असेल?
