अकोला दिव्य न्यूज : दिवाळी म्हणजे मनपसंत व मनसोक्त खरेदीचा आनंद ! प्रकाशाच्या उत्सवात कुटुंबियांच मन आणि घर उजळावे यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू असतात. आपआपल्या आर्थिक क्षमतांचा अंदाज घेत खरेदीचा मुहूर्त साधतांना नवीन काय याची चाचपणी करून खरेदी केली जात आहे.

पहिल्यांदा यंदा बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी नवीन पूजेचे सामान आले आहे. हे साहित्य लक्ष्मी पोटली व कुबेर पोटली नावाने विकलं जातं असून या पोटलीमध्ये लक्ष्मी यंत्र, गोमती चक्र, कवडी आदी सामान मिळत आहे. साधारणत: ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत त्यांची विक्री होत आहे. विशेष म्हणजे यासाठी काही दुकानावर गर्दी होते आहे.

दिपोत्सव म्हणजे प्रकाशाचा लखलखाट असायला अंगणातील मिणमिणत्या पणतीबरोबर झाडावर किंवा गच्चीवर टांगलेला आकाशकंदील दिवाळीचा अविभाज्य भाग बनला आहे. यंदाही बाजारपेठेत बांबुपासून बनवलेले, कापडापासून तसेच प्लास्टिकचा वापर करत तयार करण्यात आलेल्या पारंपरिक आकाश कंदिलाला पर्याय म्हणून काही नवीन प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये पितळ व तांबेसदृश धातूंचे आकाशकंदील वेगवेगळ्या आकारात आहेत.हे आकाशकंदील एरवी दिवाणखाण्यात सजावटीसाठी वापरता येऊ शकतात.
साध्या दिव्यांऐवजी आता रंग बदलणारे आणि रिमोट कंट्रोलने नियंत्रित होणारे एलईडी दिवे बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामुळे ग्राहकांना एकाच दिव्यात अनेक रंग व प्रकार बदलण्याचा पर्याय मिळतो. याशिवाय ऊर्जा-बचतीसाठी सौर उर्जेवर आधारीत काही आकाशकंदील आहेत. पणत्यांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने, मेणाच्या दिव्यांऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या फ्लेमलेस एलईडी टी-लाईट्साठी विचारणा होत आहे.आकाश कंदिल व विद्युत माळांमध्ये पणत्या, दीपमाळ यामध्ये चिनी बनावटीचा प्रभाव वाढला आहे. कमी दरात या वस्तु मिळत असल्याने मागणी वाढली आहे. नवे काही पर्याय असले तरी विद्युत माळांमध्ये चीनी बनावटीचा दबदबा कायम आहे.

दिवाळीत एकमेकांना भेटवस्तु देतांना आरोग्याला प्राधान्य देत हर्बल टी, ऑर्गेनिक स्किनकेअर, अरोमाथेरपी कँडल्स आणि एसेंशियल ऑइल्स यांचा समावेश असलेले ‘वेलनेस हम्पर’ भेट म्हणून देण्याकडे कल आहे.दरम्यान, सजावटीसाठी लागणाऱ्या सामानात लक्ष्मीची पाऊले, तयार रांगोळीसाठी लाकडी तसेच अक्रेलिक रांगोळ्या आल्या आहेत. यामध्ये अगदी लहान आकारापासून मोठ्या आकारापर्यंत, देवघरासमोर तसेच अंगणात काढता येतील असे तयार रांगोळीचे लाकडी साचे आहेत.
विद्युत साहित्यांमध्ये चीनी बनावटीचा दबदबा कायम
स्वदेशीचा नारा देण्यात येत असला तरी दिवाळीतील विद्युत साहित्यांमध्ये चीनी बनावटीचा दबदबा कायम आहे. भारतीय बनावटीच्या साहित्यांपेक्षा त्यांची किंमत कमी असल्याने त्यांना मागणीही आहे. दिवाळीत यंदा अनेक गोष्टी प्रथमच आल्या आहेत. त्यात लक्ष्मीपूजनासाठी असलेल्या पूजेच्या सामानातही नवलाई आहे. वैविध्यपूर्ण आकाशकंदिलांचा समावेश आहे.
