अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील ग्राहकांचा विश्वास कमावलेली आणि ग्राहकसेवेसाठी नावाजलेली अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अकोलाची 36 वी शाखा पुणे शहरातील पिंपळे निलख येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरू झाली. उद्घाटन सोहळ्याला पुणेकर नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जामय वातावरण तयार झाले होते.

उद्घाटन सोहळ्याल अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल (सीए) होते. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. बँकिंग प्रकोष्ठ प्रमुख सहकार भारतीचे अभय माटे (सीए) तसेच सहकार भारतीचे अ.भा.संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी उपस्थित राहून बँकेच्या कार्याचा गौरव केला. मंचावर बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी, उपाध्यक्ष राहुल राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष शंतनु जोशी यांनी करताना बँकेच्या वाटचालीचा आढावा सादर करीत बँकेने सहकार क्षेत्रात उभारलेले विश्वासाचे भक्कम अधिष्ठान आणि या शाखेमुळे पुण्यातील ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांचा उल्लेख केला.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी बँकेच्या विविध कर्जाच्या योजना, आकर्षक ठेवी योजना, डिजिटल बँकिंग सुविधा आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे शाखेच्या माध्यमातून बँकेच्या सेवांचा विस्तार पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे होईल.
पिंपळे निलख, पुणे शाखेचे शाखाधिकारी प्रवीण हातवळणे यांनी मंचावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. आभारप्रदर्शन बँकेचे संचालक शार्दुल दिगंबर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा जलताडे यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारीवृंदाने एकदिलाने मेहनत घेतली. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे पुणे शाखेचा शुभारंभ हा केवळ उद्घाटन सोहळा न राहता ‘अकोला अर्बन बँकेच्या विश्वास आणि प्रगतीच्या प्रवासातील एक नवा पर्व’ ठरला.
या प्रसंगी या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष राहुल राठी, तसेच संचालक अमरिकसिंग वासरीकर, प्रमोद शिंदे, मोहन अभ्यंकर, दिपक मायी, माधव बनकर, किरण खोत, कैलाश मशानकर, धनंजय पाटील, तसेच पिंपळे निलख परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, ग्राहक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शाखेमुळे पुण्यातील नागरिकांना पारदर्शक, आधुनिक आणि ग्राहककेंद्रीत बँकिंग सेवा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
