अकोला दिव्य न्यूज: Indian Railways New Rule : शेवटच्या क्षणी तुमचा रेल्वे प्रवास पुढे ढकलला गेला आणि तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करायचा त्रास सहन करावा लागत असेल तर लवकरच तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. भारतीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे. या अंतर्गत आता कन्फर्म तिकिटांची प्रवास तारीख ऑनलाइन मोफत बदलता येईल. अशा स्थितीत, प्रवाशांना आता त्यांची तिकिटे रद्द करण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे रद्दीकरण शुल्काचा त्रास कमी होईल.

रेल्वे तिकीट कॅन्सल करायचा नियम बदलणार
आतापर्यंत अशी कोणतीही व्यवस्था नाही आणि सध्या प्रवाशांचे ट्रॅव्हल प्लॅन बदलले तर त्यांना त्यांचे तिकिटे रद्द करावी लागतात आणि नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावे लागते. यामुळे नवीन बुकिंगचा खर्च वाढतो, तसेच जुन्या तिकिटावर कॅन्सलेशन शुल्क देखील आकारले जाते. अनेकदा प्रवास पुढे ढकलल्यामुळे प्रवाशांना दुहेरी नुकसान सहन करावे लागते.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी IRCTC आणि इतर एजन्सींना यावर काम जलद करण्याचे निर्देश दिले असून सध्या ही सुविधा फक्त ऑफलाइन तिकिटांसाठी उपलब्ध आहे पण, लवकरच ऑनलाइन प्रवाशांसाठी देखील लागू केली जाऊ शकते. रेल्वे यावर युद्धपातळीवर काम करत आहे आणि लवकरच, प्रवासी ऑनलाइन तिकिटांची तारीख बदलू शकतील.
ऑनलाईन तिकीट कॅन्सल करायचा नियम काय
सध्या एखाद्या प्रवाशाला त्यांच्या प्रवासाची तारीख बदलायची असेल, तर त्यांना त्यांचे तिकीट रद्द करावे लागेल आणि नवीन तिकीट बुक करावे लागते. यासाठी कॅन्सलेशन शुल्क आकारले जाईल. मात्र, नवीन सुविधेमुळे प्रवासी तिकीट रद्द न करता त्यांच्या तारखा बदलू शकतील ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. यामुळे त्यांच्या खिशावरील भार कमी होईल.
ऑफलाइन तिकीट रद्द करायचा नियम
रेल्वेच्या नियमांनुसार तुमचे तिकीट कन्फर्म झाले असेल, RAC असेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तिकीट परत करून तुमची प्रवासाची तारीख बदलू शकता, तसेच नवीन तारखेला जागा रिकाम्या असतील आणि नवीन आरक्षण शुल्क भरले असेल. ही सुविधा लवकरच ऑनलाइन तिकिटांसाठी देखील सुरू होते आहे.
