अकोला दिव्य न्यूज : cough syrup child deaths India: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता मुलांना कफ सिरप द्यावा की नाही?, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. बहुतांश वेळा लहान मुलांना होणारा सर्दी-खोकला स्वतःहून बरा होणारा (self-limiting) असतो, त्यामुळे सहा वर्षांखालील मुलांना कफ सिरप देण्याची बिलकुल गरज नसते, असे तज्ज्ञ डाॅक्टरांना वाटते. तसेच मुलांना आणि प्रौढांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपच्या मात्रेत मोठा फरक असतो, त्यामुळे कोणतेही सिरप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केवळ फार्मासिस्टच्या सांगण्यावरून घेऊ नये.

सर्दी-खोकला ही लहान मुलांमधील नेहमीची गोष्ट असून बहुतेकदा ती स्वतःहून बरी होते. त्यामुळे पालकांनी घाबरून औषधे देऊ नयेत, तर योग्य सल्ला घेऊनच कृती करावी. योग्य मात्रेत, योग्य औषधं, योग्य डॉक्टरकडून घेणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
सिरप दूषित होते म्हणून मृत्यू. सिरप दूषित नसेल, तर योग्य वैद्यकीय प्रोटोकॉल पाळल्यास त्यामुळे मृत्यू होत नाही. डेक्स्ट्रोमेथॉर्फन हायड्रोब्रोमाइड (Dextromethorphan Hydrobromide) हा घटक बहुतांश ओव्हर-द-काउंटर सिरपमध्ये असतो. हे औषध खोकल्यावर नियंत्रण ठेवणारे म्हणजेच cough suppressant आहे. ते मेंदूमध्ये खोकल्याचा रिफ्लेक्स कमी करते. त्यामुळे मूत्रपिंड निकामी होत नाहीत. असं बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.
भारतातील समस्या काय?
भारतामध्ये कफ सिरप सहज उपलब्ध असतात. ओव्हर-द-काउंटर मिळत असल्याने अनेक कुटुंबे डॉक्टरांचा सल्ला न घेताच थेट औषध घेतात. हाच मुख्य धोका आहे. कफ सिरप घ्यायचेच असेल, तर फक्त आणि फक्त डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधच घ्या.
मुलांसाठी योग्य मात्रा किती असावी?
फॅमिली डॉक्टरलाही अनेकदा लहान मुलांना वजनानुसार सिरप किती द्यायचे हे माहीत नसते. त्यामुळे बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरतो. मुलांसाठी औषधाचे मोजमाप मिलिग्रॅम प्रति किलो वजनानुसार ठरवले जाते. साधारण 0.5 ते 1 मिग्रॅ प्रति किलो इतकी मात्रा, दिवसातून जास्तीत जास्त तीनवेळा देता येते. सिरपसोबत येणारा dosing spoon किंवा कप अथवा औषधासोबत येणारे मोजमापाचे बूच यांचा वापर करावा. घरातील साध्या चमच्याचा वापर औषधासाठी केल्यास ओव्हरडोसची शक्यता अधिक असते.
चार वर्षांखालील मुलांना डॉक्टरांनी काही विशेष परिस्थितीत सिरप द्यायचे ठरवलेच, तर ते लिहूनच देतात उदाहरणार्थ -कोणती मात्रा, किती वेळा, किती दिवस इत्यादी.
कफ सिरप केव्हा द्यावे ? कफ सिरपचे दोन प्रकार असतात : कफ कमी करणारे सतत त्रास देणाऱ्या कोरड्या खोकल्यासाठी.
नाक चोंदणे कमी करणारे व शेंबूड आदींवर प्रभावी. मात्र हे दोन्ही प्रकार लहान बाळांना देणे योग्य नाही. अमेरिकेत चार वर्षांखालील मुलांना ही औषधे दिली जात नाहीत. भारतात काही अपवादात्मक परिस्थितीत, दोन वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही औषधे दिली जातात.
कफ सिरप घेताना काय तपासावे?
बहुतांश कफ सिरपमध्ये Dextromethorphan (cough suppressant) आणि त्यासोबत दोन घटक वापरले जातात. Phenylephrine आणि Pheniramine (decongestants). हे संयुग वापरलेले असल्यास तसे लेबलवर स्पष्ट लिहिलेले असते.
नेहमी विश्वसनीय आणि प्रमाणित औषधनिर्मात्या कंपनीचेच कफ सिरप घ्यावे. स्वस्त औषधे तयार करणाऱ्या अनेक कंपन्या योग्य लेबलिंग करत नाहीत, कफ सिरप कॅनमध्ये किंवा अनधिकृत बाटल्यांमध्ये पुरवतात. अशा ठिकाणी Diethylene Glycol हे स्वस्त सॉल्व्हंट म्हणून वापरतात आणि हाच पदार्थ विषारी व जीवघेणा ठरतो. त्यामुळेच मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू होतात.
Dextromethorphan मुळे मूत्रपिंडावर परिणाम होत नाही; तो nephrotoxic घटक नाही. समस्या दूषित सॉल्व्हंटमुळे निर्माण होते.
पर्यायी उपाय काय?
antihistamines उदा. Phenylephrine आणि Chlorpheniramine यांचा वापर हा दुसरा पर्याय असू शकतो ; मात्र अमेरिकेच्या FDAने दोन वर्षांखालील मुलांना ही औषधेही देऊ नयेत, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
लहान मुलांसाठी औषधी पर्याय नाहीत. त्याऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करावा.
मधाचे सेवन: एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांना हलका मध दिल्यास घसा खवखवणे थांबते.
वाफ घेणे : श्वसनमार्ग मोकळा ठेवण्यासाठी उपयुक्त.
ओलसर हवा : खोलीत आर्द्रता राखल्याने खोकला कमी होतो.
नाक चोंदल्यास : फक्त saline nasal drops वापरावेत. यात कोणतेही औषध नसते, त्यामुळे दुष्परिणाम होत नाहीत.
ओव्हरडोस झाल्यास काय होते?
कफ सिरप जास्त प्रमाणात दिल्यास मुलांमध्ये झोप येणे, थकवा, हृदयाचे ठोके वाढणे, उलट्या आणि मळमळ अशी लक्षणे दिसतात. किशोरवयीन मुलांमध्ये मात्र याचे परिणाम अधिक गंभीर असू शकतात. ‘गुंगी’ येण्यासाठी किशोरवयीन मुलं या सिरपचा दुरुपयोग करतात, असेही तज्ज्ञांना लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना त्याचे व्यसन लागण्याची शक्यता अधिक असते.
पालकांनी काय करावे, काय टाळावे?
* बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच कफ सिरप द्या.
* प्रमाणित कंपनीचे लेबल असलेले कफ सिरप घ्या.
* वजनानुसार ठरवलेलीच मात्राच द्या.
काय टाळाल?
• फार्मासिस्टच्या सल्ल्याने कफ सिरप घेणे.
• दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देणे.
• घरातील चमच्याने औषध देणे.
• माहीत नसलेल्या कंपनीचे, लेबल नसलेले कफ सिरप वापरणे.
