Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
HomeRSS च्या कार्यक्रमाला जाणार नाही ! अखेर कमलाताईंनी स्पष्टच केले....

RSS च्या कार्यक्रमाला जाणार नाही ! अखेर कमलाताईंनी स्पष्टच केले….

अकोला दिव्य न्यूज : अमरावती येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर उद्भवलेल्या वादावर खुद्द कमलताईंनी प्रथमच भाष्य केले आहे.

माझे वय ८४ वर्षांचे असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत असून ५ ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कमलताईंनी स्पष्ट केले आहे.

कमलताईंनी पत्रात काय म्हटले आहे…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५ ऑक्टोंबरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक पत्र समाजमाध्यमावर व वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाले आहे. ते पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या कुणीतरी समाज बांधवाने लिहिले असावे. त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही.

५ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमाची तारीख घेण्यासाठी माझ्या ओळखीतले काही लोक आले होते. आमच्या सर्वांप्रती मंगलभावना व मंगलकामना असतात. त्यामुळे आम्ही सर्वांचे स्वागतच करतो. आमचा मैत्रीभाव व बंधूभाव हा सर्वांप्रती आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे कमलताईंनी स्पष्ट केले आहे.
परंतु या कार्यक्रमांचे वृत्त प्रसारित झाल्याबरोबर अनेकांनी माझ्यावरच नव्हे तर स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्यावर सुध्दा टोकाच नव्हे तर दोषारोपण केले. आम्ही पण आंबेडकरी विचाराला वाहून घेतले आहे. दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावर आपले विचार मांडणेही गरजेचे असते. यासाठीही धाडस लागते.

सिंहाचे काळीज लागते. दादासाहेब जाणून बुजून अशा विरोधी मंचावरती जायचे, तेथे वंचितांचे प्रशन मांडायचे. हा त्यांच्या धोरणाचा भाग होता.आपल्याशी असहमत असलेल्यांनाही ते आपली भूमिका ऐकवावी असे त्यांचे मत होते.

ते संघाच्या कार्यक्रमात गेले पण त्यांनी हिंदुत्व कधीही स्वीकारले नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरच भाषण केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानिक विचारांची मांडणी केली.


मी त्या विचार मंचावर गेले असते तरीही आंबेडकरी विचार आणि विपश्यनाच मांडली असती. स्मृतिशेष दादासाहेब याच विचाराने त्या विचारधारेच्या मंचावर गेले आणि तिथे त्यांनी आंबेडकरी विचारच मांडले. आपण कुठेही गेलो तरी आंबेडकरी विचारच मांडणार. ते आपण शेवटच्या धासापर्यंत सोडणार नाही. हा आपल्या संस्काराचा भाग आहे.

तरीही माझ्यावर आणि दादासाहेब गवई यांच्यावर ज्या पध्दतीने वस्तुस्थितीला धरुन नसलेली टीका झाली व अजूनही होत आहे. माझे जीवन तर आंबेडकरी चळवळीला आणि विपश्यनेला वाहून घेतले आहे. या एका कार्यक्रमामुळे ते कलंकीत करण्याचा प्रयत्न होत असल्याने मी व्यथित आणि दुःखी झाली आहे. माझे वय ८४ असून माझी प्रकृती बरी नसल्याने डॉक्टराच्या सल्ल्याने सध्या उपचार घेत आहे. कुठेतरी थांबले पाहिजे, या कारणाने ५ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात जाणार नाही एवढेच.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!