अकोला दिव्य न्यूज : पाणी हा मूलभूत हक्क आहे, व्यापार नाही आणि मनपा स्वतःची जबाबदारी पार न पाडता नागरिकांना धमकावणे हे संविधानाच्या विरोधात आहे. अन्यायकारक पाणीपट्टी वसुली मागे घ्या, अन्यथा अकोल्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा जाहीर इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी दिला.

गेल्या काही महिन्यांपासून अकोल्यातील नागरिकांना अकारण व चुकीच्या पाणीपट्टी बिलांचा फटका बसत आहे. नळजोडणी नसतानाही आकारणी, मीटरशिवाय मनमानी बिलं, हद्दवाढ भागातील चुकीची वसुली, या सगळ्याचा त्रास लोक सहन करत आहेत.
आयुक्त डॉ. लहाने यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं की –
मनपाने अनेक वर्षे वेळेवर देयक दिले नाहीत. नागरिकांचा यात कसला दोष? आता ५–६ वर्षांनंतर थकबाकी भरा नाहीतर नळजोडणी तोडू, ही धमकी नागरिकांचा अपमान आहे. दोषी जर कोणी असेल तर ती यंत्रणा आहे, नागरिक नाहीत. गण २० मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत चुकीची बिले रद्द करणे, मीटर नसलेल्या ठिकाणांची आकारणी थांबवणे, प्रभागनिहाय शिबिरे घेणे, एसएमएस प्रणाली सुधारणा इत्यादी निर्णय घेण्यात आले आणि निर्णयांची अंमलबजावणी होत असताना अचानक दिलेली चेतावनी ही जनतेच्या विश्वासघातासमान आहे, असे देव म्हणाले.
आज शहरात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे. शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पुढे धम्मचक्र, दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांकडून मोठ्या थकबाकीची त्वरित वसुली करण्याचा आदेश म्हणजे “गरीबांच्या पोटावर लाथ” असल्याचा आरोप श्री. देव यांनी केला.
नागरिकांच्या वतीने ठोस मागण्या
चेतावनी त्वरित रद्द करावी. प्रभागनिहाय तक्रार निवारण शिबिरे सुरुच ठेवावी. मीटर व नळजोडणी नसलेल्या ठिकाणची आकारणी रद्द करावी. जुन्या चुकीच्या बिलांचा स्पष्ट लेखाजोखा द्यावा.
प्रत्येक नागरिकाला पाणीपट्टी तथ्यपत्रक उपलब्ध करून द्यावे.
नवीन मीटर रीडिंगपासून जुन्या चुकीच्या आकारणीपासून मुक्ती द्यावी.
जर नागरिकांवर असा अन्याय सुरूच राहिला तर आम्हाला संविधानाचा ध्वज हातात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. हा लढा फक्त पाण्याचा नाही, तर न्यायाचा आहे,असा जाहीर इशारा निलेश देव यांनी दिला. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ यांच्या माध्यमातून हे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. अकोला शहरातील नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी सुरू झालेला हा संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
