अकोला दिव्य न्यूज : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी बहुउद्देशीय संस्था संचलित सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये आयोजित सुदृढ बालक स्पर्धेत गट अ मधून वत्सल मोंढे आणि गट ‘ब’ मधून पार्थ जसवानी या बालकांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचवीच्या विद्यार्थिनी कुमारी आराध्या बहुराशी व कुमारी अदिती पारधी यांनी संगीत शिक्षक नारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागतगीत सादर केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील जे.जे. कॉलेजचे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. विनीत वरठे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारीडॉ. प्रज्ञा वरठे उपस्थित होते. अतिथींचे स्वागत शाळेच्या प्राचार्या मनीषा राजपूत व शाळेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बाळकृष्ण खांझोडे व प्राजक्ता उपशाम यांनी केले.

यावेळी दोन गटांमध्ये सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये दीड वर्ष ते अडीच वर्षे वयाच्या बालकांच्या गट अ मधून वत्सल मोंढे आणि अडीच वर्षे ते साडेतीन वर्षे वयाच्या गट ‘ब’ मधून पार्थ जसवानी हा बालक सुदृढ बालक ठरला
स्पर्धेला पालक व बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तज्ज्ञांनी लहानग्यांची दातांची स्वच्छता, केस, त्वचा, डोळे व आरोग्याच्या विविध निकषांवर तपासणी करून उंची व वजन नोंदवले. यावेळी अतिथींनी संवाद साधत योग्य आहार, मोबाईलपासून दूर ठेवण्याची गरज, मोबाइलच्या व्यसनाचे दुष्परिणाम व त्यापासून मुक्तता यासंदर्भात मार्गदर्शन केले.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी वेशभूषेत आकर्षक गरबा नृत्य सादर केले. विजेत्यांसह सर्व सहभागी बालकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजपूत यांनी दिवाळीनंतर लगेच प्ले स्कूल सुरू होणार असल्याची घोषणा केली. पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्राजक्ता उपशाम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. आभारप्रदर्शन सुषमा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
