अकोला दिव्य न्यूज : ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता’ हे शास्त्रवचन प्रत्यक्षात साकार करणारा एक अद्वितीय सोहळा आज शहरातील ९ शाळांमध्ये एकाच दिवशी १ हजार १ कन्यांचं पूजन व सन्मान करून श्रद्धा व भावनिकदृष्ट्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय संस्कृतीत कन्या पूजन केवळ धार्मिक विधी नाही, तर स्त्री शक्तीला आदराचेस्थान असल्याचे प्रतिक आहे. हा उपक्रम मुख्य आयोजक निलेश देव, निलेश देव मित्र मंडळ व अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या प्रयत्नातून, तसेच इंडीयन डेंटिस्ट असोसिएशन अकोला शाखेच्या सहभागातून पार पडला.

अकोल्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण : अकोल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कन्या पूजन झाले. शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. कन्यांच्या डोळ्यांत चमकणारा आनंद, पालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि समाजातील प्रत्येक घटकाने अनुभवलेली भावनिक एकात्मता हे दृश्य विस्मरणीय होते.

सोहळ्याचे वैशिष्ट्य : प्रत्येक शाळेत कन्यांचे पारंपरिक विधीने पूजन, फुलांचा वर्षाव व तिलक करून भेटवस्तू देऊन शिक्षण व आत्मविश्वासाला प्रोत्साहन, शेकडो पालक, शिक्षक, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, वातावरणात दरवळणारी श्रद्धा, संस्कार आणि एकात्मतेची भावना, नारीशक्तीचा गौरव, समाजासाठी संदेश आणि कन्या पूजन म्हणजे केवळ एका दिवसाचा सोहळा नाही, तर नारीशक्तीला दिलेले आदराचे वचन आहे.

मुलगी ही घरातील ‘लाडकी’च नव्हे तर भविष्यातील माता, शिक्षिका, मार्गदर्शक व संस्कारांची जननी आहे. तिच्या विद्या, संस्कार व आत्मविश्वासानेच समाज सशक्त होतो. नारीशक्तीचा सन्मान हा केवळ कुटुंबापुरता मर्यादित नसून राष्ट्राच्या प्रगतीचा आधार आहे.
