अकोला दिव्य न्यूज : शेतकरी विविध संकटांशी सामना करीत असतानाच पुन्हा एक गंभीर संकट त्यांच्या समोर उभे झाले आहे. सध्या शेतात कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांवर फवारणी सुरू आहे. या फवारणीमुळे बऱ्याच ठिकाणी फवारणी करणाऱ्यांसह इतरांनाही डोळ्याचा त्रास होत आहे. फवारणीच्या औषधामधील विषारी केमिकल्समुळे अनेकांच्या डोळ्यातील बुबुळांना हानी पोहोचू लागली आहे. हे सर्व प्रकार डोळ्यांसाठी अतिशय घातक असून फवारणी करणाऱ्यांसह शेतात जाणाऱ्या इतरांनी सुद्धा दक्षता बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटनेचे अध्यक्ष तथा प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. शिरीष थोरात यांनी केले आहे.

मागील दोन आठवड्यांपासून या फवारणीमुळे डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने अनेक पेशंट डोळ्यांच्या रुग्णालयात येऊ लागले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील विविध डोळ्यांच्या दवाखान्यात दररोज सुमारे 200 ते 300 पेशंट डोळ्यांवर इलाज करण्यासाठी येत आहेत. फवारणी केल्यानंतर काहींना लगेच दोन तासात तर काहींना पुढील दोन दिवसांच्या कालावधीत हा त्रास होऊ लागला आहे. डोळ्यात कचरा गेल्यासारखे वाटणे, डोळ्याची भयंकर आग होऊन त्यातून पाणी येणे ही या फवारणीनंतर जाणवणाऱ्या त्रासाची प्रारंभीची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसतात संबंधितांनी तातडीने नेत्र तज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावा असाही इशारा वजा सूचना डॉ. शिरीष थोरात यांनी दिला आहे.
सुमारे एक महिना म्हणजे दसरा, दिवाळीपर्यंत या फवारण्या सुरू राहणार आहेत. दिवसेंदिवस अधिक पावरफुल फवारणी औषधे तयार झाली असल्यामुळे फवारणी करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ शेतात गेलेल्यांनीच नव्हे तर रस्त्यालगत असलेल्या व नुकतीच फवारणी झालेल्या शेतात जवळून गाडीने जात असताना वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सुद्धा या औषधांचा घातक परिणाम डोळ्यावर होण्याची शक्यता आहे.
काही औषधांमुळे तर शरीरास खाज सुटण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत. त्यामुळे फवारणी करणाऱ्यांनी पांढऱ्या काचांचा साईड बंद असलेला गॉगल तसेच चेहरा पूर्ण झाकलेला व उघड्या हाता पायांवर प्लास्टिकचे अथवा कापडाचे हात मोजे, पाय मोजे अवश्य घालावेत. जेणेकरून डोळ्यांचा बचाव होऊ शकेल. तसेच फवारणी संपताच तातडीने डोळ्यांसह हात पाय स्वच्छ धुण्यास प्राधान्य द्यावे. तसेच फवारणीच्या औषधांची विक्री करणाऱ्यांनी सुद्धा दुकानात अशा प्रकारचे गॉगल्स व सॉक्स विक्रीसाठी ठेवून फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती देणारे एखादे पॉम्पलेट सोबत दिल्यास या प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल. सोबतच प्रशासनाने सुद्धा कृषी सेवा केंद्रांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
