अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, याविरोधात अकोला येथील ओबीसी समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असल्याने, समाजाने आज गुरुवार 25 सप्टेंबर रोजी आक्रोश सभा आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून जनार्दन हिरळकर, शंकर बापूराव पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे आणि ॲड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशीकर या पाचजणांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात प्रवेश देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज आठवा दिवस असून, विविध संघटना व गावागावांतून पाठिंब्याची पत्रे येत आहेत.

दरम्यान चार संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून वंचित बहुजन आघाडीच्या महिलांसह माजी आमदार नारायण गव्हाणकर, हरिदास भदे, विजयराव कोसल आणि इतर अनेक नेत्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने ओबीसी समाजाने आज गुरुवार 25 सप्टेंबर रोजी आक्रोश सभा आयोजित करण्याची घोषणा केली आहे.
समाजातील सर्व घटकांना, ज्यात ओतारी, डोबारी, छप्परबंद मुस्लिम, माकडवाले, लभाणी, वेरड, रामोशी, मुस्लिम शाहा, मुस्लिम मदारी, मन्नेवार, बागवान आणि इतर जातींचा समावेश आहे, या सभेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे आंदोलन सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
