अकोला दिव्य न्यूज : काश्मीरमधील तब्बल ३०३ पर्यटन सहली पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले पर्यटन उद्योजक तसेच दिव्यांगांना साहसी प्रवासाची आवड लावण्याचे कार्य करणारे व काश्मिरमध्ये ३७० कलम असताना व हटविल्यानंतर, अशा दोन्ही परिस्थितीत कुठलाही त्रास पर्यटकांना होऊ नये याची खबरदारी घेवून काश्मीर व लेहमधील छोटे व्यावसायिक, हाऊसबोटवाले, हॉटेल व्यावसायिक यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे डॉ. माधव देशमुख व इंद्राणी देशमुख यांच्या कार्याची दखल घेत क्रांतीसूर्य कार्यगौरव पुरस्काराने करण्यात आले.

काळजाला भिडावे असं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ४१ व्यक्तींना सन्मानित करण्याओ सूर्य क्रांती शेती शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शिर्डी येथील साई सिल्वर ओक लॉन्समध्ये सूर्यक्रांती कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ माधव देशमुख यांचा क्रांतीसूर्य कार्यगौरव पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. माधव देशमुख यांनी जास्तीत जास्त सामान्य नागरिकांनी पर्यटनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. वर्षातील काही दिवस पर्यटन केल्यास वर्षभरातील कामाचा ताण कमी होण्यास मदत होते, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो, असे सांगितले.
यावेळी मंचावर कानसा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील,आमदार सुधीर तांबे, आयोजक संस्थेचे अध्यक्ष खंडू सातपुते व सचिव प्रा गोरक्ष भंवर उपस्थित होते. डॉ माधव देशमुख सोबतच महाराष्ट्रातील इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा देखील सन्मानचिन्ह व पदक देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योगपती, शेतकरी, समाजकार्य करणारे तथा गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
काश्मीर, लद्दाख, लेह, अंदमानसारख्या दुर्गम भागात महिलांच्या स्वतंत्र सहली काढण्याचे काम इंद्राणी व डॉ. माधव देशमुख दांपत्य करीत आहेत. हिमालयातील दुर्गम भागात, ज्या ठिकाणी सामान्य पर्यटक जाण्याची कल्पना करू शकत नाही, अशा ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून देशमुख दाम्पत्य सातत्याने काम करीत आहेत, हे विशेष.
