Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
Homeजमावाने भाजप कार्यालय पेटवलं ! पोलिसांवर दगडफेक; लडाखला पुर्ण राज्याचा दर्जासाठी हिंसक...

जमावाने भाजप कार्यालय पेटवलं ! पोलिसांवर दगडफेक; लडाखला पुर्ण राज्याचा दर्जासाठी हिंसक आंदोलन

अकोला दिव्य न्यूज : Ladakh BJP Office Vandalise : लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी आज बुधवार २४ सप्टेंबरला ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं झाली. आंदोलकांनी भाजपाच्या कार्यालयावर हल्ला केला, तसेच कार्यालय पेटवलं आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. लडाखचा सहाव्या अनुसूचित समावेश करावा आणि केंद्रशासित प्रदेशाऐवजी राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. अलीकडेच ही मागणी घेऊन लडाखमधील नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. या आंदोलनाने आज हिंसक वळण घेतलं.

संतप्त जमावाची पोलिसांबरोबर झडप झाली. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेकही केली. आंदोलकांनी लेह येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आंदोलकांना पांगवण्यास पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांवर लाठीहल्ला करावा लागला.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन हिंसक बनलं. वागंचूक हे गेल्या १५ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनाच्या चार प्रमुख मागण्या आहेत. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही त्यापैकी पहिली मागणी आहे. तसेच लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचित समावेश करावा, कारगिल व लेह या दोन जिल्ह्यांना लोकसभा मतदारसंघ घोषित करावं आणि लडाखमधील शासकीय नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावं या मागण्यांसह लडाखमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

जमीन, संस्कृती आणि संसाधनांच्या संरक्षणासाठी विद्यार्थी रस्त्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवलं, तसेच जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा हटवला. त्यानंतर जम्मू-काश्मीर हा एक वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित केला. तर कारगिल, लेह मिळून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश घोषित केला. मात्र, मागील तीन वर्षांपासून लडाखमधील लोक सातत्याने त्यांची जमीन, संस्कृती आणि संसाधनांच्या संरक्षणासाठी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी घेऊन आंदोलनं करत आहेत, संवैधानिक सुरक्षा उपायांची मागणी करत आहेत. परंतु, आज या आंदोलनाने हिंसक वळण घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!