अकोला दिव्य न्यूज : खामगाव चिखली बायपासवरील जुगनू हॉटेलात मंगळवारी रात्री धक्कादायक दुहेरी हत्येची घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतःलाही भोसकून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी तपासात समोर येत असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये २१ वर्षीय युवती व सोनू उर्फ साहिल राजपूत (२३, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातूनच साहिलने हॉटेलात पायलवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःवर वार करत त्याने जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, शहर पोलिस निरीक्षक आर. एन. पवार, शिवाजीनगर पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहीरकर तसेच खामगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक तावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी
दुहेरी हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाहण्यासाठी जमलेल्या जनसमुदायामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
गर्दी पांगविण्यासाठी पोलिस बळाचा वापर : नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, एसआरपीचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. मृतदेहाचा पंचनामा करून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
