अकोला दिव्य न्यूज : खामगाव शहरातील रस्ता विस्ताराच्या जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकोल्यातील भूमाफिया व त्याच्या साथिदाराला खामगावातील काहींनी चांगलाच चोप देऊन हुसकावून लावले. ही घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडली असून, काही युवकांनी संतापून भूमाफिया व त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण केली, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

नागरिकांनी अकोल्यातील राजकीय प्रभाव असलेला भूमाफिया खामगाव शहरात येऊन रस्त्यालगतच्या जागेवर दावा करत होता. जेसीबी आणि मनुष्यबळाच्या जोरावर जागा ताब्यात घेण्याच्या वाद प्रयत्नात असताना स्थानिक नागरिकांनी विरोध केला, त्यामुळे उफाळला. संतप्त झालेल्या जमावाने संबंधितांची चांगलीच खरडपट्टी काढली.
पोलिस निरीक्षक आर. एन. पवार यांनी दोन्ही पक्षांना कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला आणि दिवाणी न्यायालयात तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले.घटना घडताच पोलिस तत्काळ दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात असून मारहाणीबाबत पोलिसांना माहिती नाही, तशी तक्रारही नाही.
खामगाव शहर पोलिसांची तत्परता !
या घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाढता वाद आटोक्यात आणला. दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करत वातावरण शांत केले. संबंधितांचा रोष लक्षात घेता पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत संभाव्य गोंधळ टाळला. वाद वाढू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
