अकोला दिव्य न्यूज : प्राथमिक शिक्षणाच्या सुरूवातीपासून अभ्यासासोबत विविध खेळांचा सराव करीत, ‘बॅडमिंटन’ या खेळाची निवड करुन आकांक्षा राहुल कराळे हिने अखेर ‘बॅडमिंटन’ खेळात प्राविण्य मिळवले. अमरावती विद्यापीठाला कलर कोट मिळवून देत आकांक्षा कराळे हिने विद्यापीठासह कराळे कुटुंब व प्रभात किड्सचे क्रीडा जगतात नावलौकिक केले.

अकोला येथील प्रभात किड्सची माजी विद्यार्थी आणि अमरावती विद्यापीठाचा समाज शास्त्र पदवी अभ्यासक्रमाचा शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी आकांक्षा कराळे हिने कलर कोट पटकाविल्याबद्दल प्रभात किड्स येथे संस्थाध्यक्ष डॉ. गजाननराव नारे, वंदनाताई नारे यांनी पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन तिचा सन्मान केला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

आपलं मनोगत व्यक्त करताना आकांक्षा हिने क्रीडा क्षेत्रातील यशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आपल्या यशात आजोबा जगन्नाथ उपाख्य जे.टी.कराळे, प्रभात किड्स संस्थाध्यक्ष डॉ. गजानन नारे, वंदनाताई नारे, वडील राहुल कराळे, आई वैशाली कराळे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.
शेगांव नागझरी येथील मुळ रहिवासी आणि बी बियाणे उत्पादन क्षेत्रात ख्यातनाम महिको या कंपनीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले आणि पश्चिम विदर्भातील कृषी क्षेत्रातील एक सन्माननीय व्यक्तीमत्व आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून जे.टी. या नावाने जगन्नाथ कराळे यांची ओळख आहे. शेती व शेतकरी यांच्यासाठी कराळे यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे. आकांक्षा ही सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर यांच्या मुलीची मुलगी (नात) आहे.