अकोला दिव्य न्यूज : पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना अकोला जिल्ह्यात २२ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होते. गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार उद्या 28 एप्रिलला या पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून या बाबतीत अजून अधिकृतपणे माहिती दिली गेली नाही.

महाराष्ट्र राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला असून सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागरिक नागपूर जिल्ह्यात आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अमित शहा यांच्या आदेशानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यात राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळले. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळले. त्यानंतर ठाण्यात 1हजार 106, तर मुंबईत केवळ 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळले.
वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्यांना 2 दिवस वाढीव
योगेश कदम म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रात 5 हजार 23 पाक नागरीक आहेत. यातील एक कॉलम अनट्रेसेबल पाक नागरिकांचा आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवायचे आहे. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. तूर्त सार्क व्हिसा व शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना 2 दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.

जे पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी येथे आलेत. त्यांना 2 दिवस वाढवून देण्यात आलेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणे अजून सुरू असल्यामुळे या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही योगेश कदम यांनी याविषयी बोलताना सांगितले.



