अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरात अवैध सावकारीविरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून काल शुक्रवारी धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

शहरात अवैध सावकारी होत असल्याच्या तक्रारी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांच्याकडे प्राप्त झाली. लहान उमरीतील दीपक गव्हारे, संतोष आंबिलकर, जठारपेठ येथील नितीन अबुज यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अन्वये धाड कारवाई करण्यात आली. यासाठी तीन पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार पथक एकच्या प्रमुख रोहिणी विटनकर, पथक सहायक विनोद खंदारे, एम. वाय. परतेकी व आर.एस. इंगळे यांनी दीपक गव्हारे यांच्याकडे शुक्रवारी धाड टाकली.

पथक क्रमांक दोनचे प्रमुख मिलिंद मनसुटे, पथक सहायक एस.ए. गावंडे, जयंत सहारे व एस. डी. नरवाडे यांनी नितीन अबुज, तर तिसऱ्या पथकाचे प्रमुख अनिल मनवर, पथक सहायक सतीश फुके, शारदा आगासे व अनंता अढाऊ यांनी संतोष आंबिलकर यांच्याकडे धाड टाकली. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, धनादेश, नोंदवह्या, खरेदीखत, स्थावर सौदा चिठ्ठी लेख, खरेदीच्या छायाप्रति, कोरे मुद्रांक, भाडे करारनामा, बँक पासबुक आदी जप्त करण्यात आले आहेत.

अवैध सावकार प्रकरणाची १५२.५३ एकर शेतजमीन परत : आतापर्यंत अवैध सावकारी अंतर्गत बळकावलेली एकूण १५२.५३ एकर शेतजमीन व ४९३९.५० चौ. फूट जागा तसेच एक राहता फ्लॅट संबंधितांना परत करण्यात आलेला आहे. तसेच आतापर्यंत २०१ प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहेत. त्यापैकी ५८ प्रकरणामध्ये फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून १०१ प्रकरणी कलम-१६ व १८ (१) अन्वये चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांकडून देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास अशा व्यक्तीची तक्रार आवश्यक पुराव्यासह आपल्या तालुक्याच्या उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात तक्रार करावी, ज्या नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल, त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, परवानाधारक सावकार यांच्याकडून रितसर कर्ज घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.