अकोला दिव्य न्यूज : केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना सत्ताधारी पक्षाचे मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांना चक्क बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देऊन ठाणेदाराचे निलंबन करण्याची मागणी केली होती.

संबंधित ठाणेदाराची उचलबांगडी करून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. त्यामध्ये ठाणेदारांनी कर्तव्यात कसूर करण्यासह निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले. सोबतच शिवीगाळ करण्याचे पुरावे आढळून आल्याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पोकळे यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक एका ट्रकमधून करण्यात येत असल्याच्या संशय भाजप कार्यकर्ते हरीश वाघ यांना आला होता. त्यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी ते वाहन तपासून सोडून दिले. संबंधित कार्यकर्त्याने याची माहिती आमदार हरीश पिंपळेंना दिली. आमदारांनी ठाणेदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केल्यावर ठाणेदारांनी असभ्य भाषेत संवाद साधला.

आमदारांकडे तक्रार केल्यामुळे संतापाच्या भरात ठाणेदारांनी भाजपच्या त्या कार्यकर्त्याला देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकाराची ध्वनीफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाली होती.
कार्यकर्त्याने हा प्रकार आमदारांच्या कानी घातल्यावर त्यांनी पुन्हा ठाणेदाराशी संपर्क केला, तर त्यांना देखील ठाणेदाराने शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची आमदार हरीश पिंपळे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांची तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

अकोटचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांना प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्राथमिक चौकशीमध्ये ठाणेदार यांनी असभ्यवर्तन करून शिवीगाळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची नोंद सुद्धा ठाणेदारांनी घेतली नव्हती. ठाणेदारांनी शिवीगाळ करून अशोभनीय वर्तन केल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली. या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कारवाईचा बडगा उभारून पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत प्रकाश तुनकलवार यांना अकोला पोलीस मुख्यालय येथे हजेरी द्यावी लागणार आहे.