अकोला दिव्य न्यूज : राज्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, अलिकडच्या काही वर्षांत यंदा पहिल्यांदाच चंद्रपूरला मागे ठेवून अकोला जिल्ह्याने सर्वाधिक ४४.१अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली.संपूर्ण महाराष्ट्रातच तापमानाचा पारा चढला असताना अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस इतकी सर्वाधिक तापमानाची नोंद काल गुरुवार १८ एप्रिलला करण्यात आली. अकोला पाठोपाठ यवतमाळ येथे ४३.३ व चंद्रपूर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान होते.

अकोल्याचे तापमान चढत्या क्रमाने असल्याने अकोल्यात ‘हीट वेव्ह’ चा धोका निर्माण झाला असून लोकांनी अत्यंत महत्त्वाचे काम असले तरच घरा बाहेर जावं. घराबाहेर पडताना आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. येत्या काही दिवसांपर्यंत ही परिस्थिती कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. यात देखील अकोल्याचे तापमान सातत्याने ४२ अंश सेल्सिअस होते. जिल्हात अवकाळी पाऊस अधूनमधून डोकावत असला तरी तापमानावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा एकदा तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी कशी घ्यावी. असह्य तापमानामुळे चक्कर येणे, उष्माघात तसेच विविध आजार उद्भवू शकतात. आजार व उष्माघातचा त्रास आपण टाळू शकतो. मात्र त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे.

वातावरणातील तापमान खूप वाढत असल्याने शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर पडू नये. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट ठेवावे. जेणेकरून ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो.पण अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये.

संपूर्ण राज्यातच उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला येथे ४४ पेक्षा अधिक, यवतमाळ, चंद्रपूर येथे ४३ पेक्षा अधिक तर अमरावती, वाशीम येथे ४२ पेक्षा अधिक आणि नागपूर, ब्रम्हपुरी, वर्धा येथे ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रात देखील सोलापूर, जेऊर, मालेगाव येथे ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर औरंगाबाद, परभणी येथेही कमाल तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता.

विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरीही दिवसा मात्र तीव्र उन्हाचे चटके बसत आहेत. नागरिक सध्या उन्हाच्या चटक्याने आणि उकाड्याने त्रस्त झाले आहेत.