अकोला दिव्य न्यूज : पारंपरिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात निसर्ग साथ देत नाही, त्यामुळे उत्पन्न कमी होतं, हातातोंडाशी आलेलं पीक बळीराजाच्या हातून जातं, अशी परिस्थिती ओढावते. मात्र यातून खचून न जाता, नव्या प्रयोगातून अकोल्यातील महिला शेतकऱ्याने आर्थिक प्रगती साधली आहे. अकोल्याच्या दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला शेलगावकर यांनी कलिंगडची शेतीचा करण्याचा निर्णय घेऊन त्या माध्यमातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे.

७५ दिवसांत अडीच लाखांचं विक्रमी उत्पन्न
अकोल्याच्या पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पातूर तालुक्यातील शेतकरी महिलेने केवळ एका एकरात कलिंगडाची लागवड करत, योग्य नियोजन, मशागत आणि कृषी केंद्रांमधून मार्गदर्शन घेऊन, अवघ्या ७५ दिवसांच्या कालावधीत अडीच लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतलं आहे. याशिवाय आणखी २५ ते ३० हजारांचं उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उर्मिला शेलगावकर त्यांच्या शेतात एक कलिंगड सरासरी ६ ते ७ किलो वजनाचं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून त्यांच्या मालाला मोठी मागणी होत आहे. त्यांच्या या यशामागे नियमित पीक निरीक्षण, योग्य आंतर मशागत आणि बाजारपेठेचा योग्य अभ्यास महत्वाचा ठरत आहे. एका एकरातील कलिंगडाचं उत्पन्न बघून आणखी दोन एकरात त्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे उर्मिला या उच्च शिक्षित आहेत. एमए, बीएडपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं, पण नोकरीच्या शोधात वेळ न घालवता त्यांनी शेती व्यवसाय निवडला आणि आज त्या भरघोस उत्पन्न घेत आर्थिक प्रगतीही करत आहेत.
पतीचीही मोलाची साथ
शेतकरी महिला उर्मिला यांच्या बरोबर त्यांचे पतीही तितकीच साथ देतात. उर्मिला यांची शेतीतील जिद्द, चिकाटी आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या इच्छेला न थांबवता त्यांना साथ देत, त्यांना प्रोत्साहन देतात. शेतातील कुठलंही काम असो, त्याचा निर्णय उर्मिलाच घेतात. कृषी विभागाचे सल्ले घेऊन पती-पत्नी अगदी नियोजनबद्ध शेती करत आहेत. त्यामुळेच त्यांनी शेती यशस्वीरित्या फुलवली आहे.