अकोला दिव्य न्यूज : अकोल्याच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत सक्रिय व प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व स्व. सीमा शेटे-रोठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आदरांजली’ सभेचे आयोजन अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात भावपूर्ण वातावरणात करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सीमाताईंच्या कार्यास अभिवादन केले. त्यांच्या आठवणी, कार्याचा वेध घेत त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल होते. मार्गदर्शक म्हणून बाजी वझे आणि शेटे परिवारातील अविरत शेटे उपस्थित होते. संचालन अशोक ढेरे यांनी तर प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे यांनी केले. या सभेत विविध संस्था, साहित्यिक, समाजसेवक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, वाचनालय कार्यकर्ते, नाट्यकर्मी, आकाशवाणीवरील सहकारी, कुटुंबीय आणि शेकडो चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रद्धांजलीपर मनोगतात विजय कौसल यांनी त्यांच्या १९८२ पासूनच्या आठवणी सांगत त्यांच्यातील नेतृत्व, वक्तृत्व आणि दातृत्वाचे गुण असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर, डॉ.स्वाती दामोदरे व मोहिनी मोडक (अक्षरा), प्रा. निशाली पंचगाम व पूजा काळे (आकाशवाणी), डॉ. आशा मिरगे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, शौकत अली मीरसाहेब, ज्योती सरदार (साने गुरुजी वाचनालय), डॉ. राजेंद्र मेंडकी (ग्रंथालय संघ), प्रा. मधू जाधव, डॉ. गजानन मालोकार,नितीन खंडेलवाल, बंडुभाऊ क्षीरसागर, दिलीप देशपांडे (नाट्यकर्मी), विद्यापीठ सदस्य डॉ.श्रीकृष्ण काकडे, डॉ. एम. आर. इंगळे, प्रकाश अंधारे, अविरत शेटे यांनी सीमाताईचा विविध क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. शेवटी अनंत गद्रे यांनी एक भावपूर्ण गीत सादर केले .
सीमाताईंच्या जीवनकार्याचा विविध पैलूंनी उलगडा करणारी ही सभा अकोल्याच्या सांस्कृतिक इतिहासात एक संस्मरणीय पर्व ठरली. श्रद्धांजली सभेला अकोल्यातील विविध संस्थाचे प्रतिनिधी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.