अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : पुरोगामी महाराष्ट्रात अलीकडे पुणे आणि इतर शहरात धर्मादाय हॉस्पिटल व खाजगी रुग्णालयात घडलेल्या घटनांनी समाजमन ढवळून निघाले आहे. पैसा आणि केवळ पैसाच डॉक्टरांचा उद्देश आहे, असा आरोप केला जातो. काही प्रमाणात हे खरं असलं तरी सगळ्याच डॉक्टरांना या एकाच चष्म्यातून बघणं अत्यंत गैर आहे. काही डॉक्टरांचा कामकाजामुळे वैद्यकीय सेवा टीकेचा धनी झाला आहे. मात्र अनेकदा डॉक्टरांच्या समयसूचकेमुळे देवासारखे भेटले, अशा प्रतिक्रियासुद्धा ऐकायला मिळतात. अकोल्यात अशाच एका देवदूत डॉक्टरवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

डॉक्टरांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे एका तरुणाचा जीव वाचल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही घटना रामनवमीच्या दिवशी दुपारची असून, जवळपास ८० वर्ष वयाचा एक म्हातारा व एक तरुण मुलगा हे दोघे जण एका रुग्णाला घेऊन आले. रुग्णाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्याने रक्तस्राव होता. रुग्णांचा वरचा रक्तचाप (BP) फक्त ५० ते ६० एवढा, खालचा रक्तचाप जवळपास शून्य, मानवी शरीराचा कंबरेच्या खाली आणि पायांच्या वरच्या भागाला जोडणारी मांडी (hip) डिसलोकेट झालेली होती. महत्वाचे म्हणजे रुग्ण दारू प्यायलेला, क्रॉनिक दारुडा होता. विशेष म्हणजे या दोघांनाही हा रुग्ण अनोळखी होता. रुग्णाची एकुणच प्रकृती बघता डॉक्टरांनी जुजबी माहिती घेत, सोबतीला आलेल्या मुलाचा मोबाईल नंबर घेतला.

वेळेची गरज ओळखून डॉक्टरांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपलं कर्तव्य सुरू केले. अतिदक्षता विभागात रूग्णाला दाखल करुन, अगोदर रूग्णाचा बीपी सेटल केला.ऑक्सिजन लाऊन श्वासोच्छ्वास सुरळीत केला. काही वेळाने रुग्ण स्थिर झाला तेव्हा डोक्याला मार असल्याने सीटी स्कॅन करून घेतले. सीटी स्कॅनचा रिपोर्ट नॉर्मल होता. तो पर्यंत ते दोघे जण रुग्णालयात थांबले होते. मात्र नंतर कधी निऊन गेले ते कळलेच नाही. परंतु कुठलाही विचार न करता मांडीतील तुटलेले हाड पुन्हा जागेवर जोडण्यासाठी रूग्णावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी भूलतज्ञ डॉक्टरला (अँनेस्थेसीया) डॉक्टरांनी स्वतः पैसे दिले.

डॉक्टरांनी आवश्यक औषधी देखील स्वतःच्या पैशाने घेतली. रुग्णाला ट्रॅक्शन बांधले. रुग्णाची स्थिती धोक्या बाहेर येऊ लागली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत रुग्ण आयसीयु मध्ये होता. डॉक्टरांनी ‘त्या’ मुलाला फोन केला. तेव्हा सदर रुग्णाचे नाव राजू कनोजिया असून त्याचा नातेवाईकांना माहिती दिली असल्याचे त्याने सागितले. दुसऱ्या दिवशी दुपारी नातेवाईक आले. आता रुग्ण ठणठणीत बरा झाला असताना आणि जर अर्धा तास उशिर झाला असता तर तो दगावला असता, अशा परिस्थितीत कशाचीही तमा न बाळगता अकोला येथील ख्यातनाम सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.तरुण राठी यांनी स्वतःला रुग्ण सेवेत वाहून घेतले. दरम्यान डॉ राठी यांनी केलेल्या खर्चाची रक्कम मागितली. तेव्हा नातेवाईक आढेवेढे घेवू लागले.अखेर एकाने समजूतदारपणा दाखवला.
रामनवमीच्या दिवशी एका रुग्णाचे जीव वाचविले, हीच राम भक्ती वा राम सेवा केल्याचे समाधान आहे, असं डॉ. राठी यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना सांगितले. सर्वत्र अंधारून आले असताना अकोला येथील डॉ.तरुण राठी सारख्या डॉक्टरांच्या कर्तृत्वाने समाजाला एक नवी उभारी, नव्या उत्साहाच बळ मिळते. यामध्ये दुमत नाही. शेवटी एकच की डॉक्टर तुम्ही देव नाही पण देवदूत जरुर आहातं !