अकोला दिव्य न्यूज : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरासह अकोला शहर व ग्रामीण भागात सकाळपासून उत्साहाला उधाण आले होते.अशोक वाटिकेला यात्रेचे स्वरूप आले होते तर शहरात विविध भागात व ठिकठिकाणी सकाळपासून शांततेत ‘भीम जयंती’ साजरी केली जात असताना, रात्री ११ वाजताच्या सुमारास या उत्सवाला मात्र गालबोट लागलं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

अकोला शहरातील गंगा नगर वाशिम बायपास जवळ काल सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारासडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना काही असामाजिक तत्वांनी वाद घालत एका मोटरसायकलवर दगडफेक केली. या दगडफेकीला प्रतिउत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील दगडफेक केली.यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी जुने शहर पोलिसांचा ताफा दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी दोन्ही गटाच्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला.सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी अफवांवर लक्ष देवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अकोला शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुळकर्णी हे घटनास्थळी ठाण मांडून होते. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी राम नवमीला देखील जुने शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही असामाजिक तत्वांनी केला होता. मात्र जुने शहर पोलिसांनी कारवाई करीत असामाजिक तत्वांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता. काल आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट लागले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली पण साप गेल्यावर काठी चालवणे कितपत योग्य आहे. अलिकडच्या काळात शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून शहराचे वातावरण खराब करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आहे. पोलिसांचा जरब/धाक संपल्यात जमा असून, शहरातील विविध भागात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

अकोला ग्रामीण भागातील लहानमोठ्या गावात अवैध दारू विक्री उघडपणे केली जात आहे. काही गावांमध्ये बसून दारू पिण्याची व्यवस्था आहे. असामाजिक तत्वांचा बोलबाला असून रहदारी पोलिस वाहतूक व्यवस्था चोख करण्यापेक्षा चालान देणेच पसंत करतात. एकमात्र खरं की अवैध गुटखा विक्रीवर पोलिस न चुकता छापेमारी करून आपलं कर्तव्य दाखवून देत आहे. मात्र एकाही गुटखा माफियाला शिक्षा झाल्याचे आजवर ऐकण्यात आले नाही आणि विक्री देखील सुरू आहे. पोलिसांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.