अकोला दिव्य न्यूज : Mehul Choksi : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी त्याला सीबीआयच्या विनंतीवरुन अटक करण्यात आली आहे.

मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता. कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. तसंच ईडी आणि सीबीआयने त्याला वाँटेड जाहीर केलं होतं. आता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी आजारी असल्याची माहिती समोर आली होती. त्याला कॅन्सर झाला आहे अशीही शक्यता तेव्हा वर्तवण्यात आली होती. दरम्यान सीबीआयच्या विनंतीनंतर मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

मेहुल चोक्सीचा पासपोर्टही रद्द
मेहुल चोक्सीवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीच्या जप्त केलेल्या साऱ्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेनं सुरू केली आहे. जेणेकरून त्याची आर्थिक कोंडी करणं शक्य होईल. मात्र, मेहुल चोक्सीनं प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास शक्य नाही असं त्याच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे, मेहुल चोक्सीची भारतात येण्याची प्रक्रिया आणखी काही काळासाठी पुढे गेल्याची माहिती फेब्रुवारी महिन्यात समोर आली होती.

दरम्यान, मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणाच्या तपास फाईल्स मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केल्याने आता त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे असंही म्हटलं जातं आहे.

२०१८ मध्ये PNB घोटाळा उघड झाला
पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा २०१८ मध्ये उघडकीस आला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे.

मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत?
१) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. २) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ३) नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना एलओयू(लेटर ऑफ अंडरटेकिंग), फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.
