अकोला दिव्य न्यूज : सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्हेगार विविध प्रकारची शक्कल लढवून सर्वसामान्यांना लूटत असल्याचं पाहायला मिळतात. तुमच्या नावाने आलेलं पार्सल कस्टममध्ये अडकलंय, इथपासून तुमच्या मोबाईलवर मी चुकून जास्त पैसे पाठवले, इथपर्यंत वेगवेगळी कारणं सांगून भोळ्याभाबड्या व्यक्तींची फसवणूक केली जाते. अशा परिस्थितीत एका हुशार मुलीने सायबर गुन्हेगाराला चांगलाच धडा शिकवला. हे पाहून आरोपीही चकित झाला आणि तिला ‘मान गये’ म्हणाला.

काय आहे प्रकरण ?
‘एक्स’ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत एक मुलगी एका व्यक्तीशी फोनवर बोलताना दिसते. संबंधित आरोपी मुलीला तिच्या वडिलांचा मित्र असल्याचे भासवत होता. तुझ्या वडिलांनी मला तुझ्या UPI अकाउंटमध्ये पैसे पाठवायला सांगितले आहेत, असं तो माणूस अतिशय आत्मविश्वासाने आणि गोड बोलून सांगतो. मुलगी आपलं वडिलांशी असं कुठलंच बोलणं झालं नसल्याचं सांगते. तरीही तो मी तुला 12,000 रुपये UPI द्वारे पाठवणार असल्याचं सांगतो. तो तिच्यासोबत फोनवर बोलत राहतो.

आधी टेस्ट म्हणून दहा रुपये आणि नंतर 10,000 रुपये पाठवल्याचा दावा तो करतो. मुलगी आपला फोन कॅमेरामध्ये दाखवते. त्यावर तिला 10,000 रुपये पाठवल्याचा SMS आलेला असतो. पण तो मेसेज बँकेकडून आलेला नसून एका पर्सनल मोबाईल नंबरवरून आलेला असतो.

तो माणूस तिला फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आलेलं असतं. आता उर्वरित दोन हजार रुपये पाठवण्याचा बहाणा करताना तो पुन्हा पर्सनल नंबरवरुन पैसे पाठवतो. मात्र नव्या एसएमएसमध्ये 2,000 ऐवजी 20,000 रुपये लिहिलेले असते. त्यावर तो चुकून जास्तीचे पैसे गेल्याचं सांगतो आणि 12,000 रुपये स्वतःजवळ ठेवून उर्वरित 18,000 रुपये परत पाठवायला सांगतो.
मुलीला माहीत होते की हा माणूस तिला फसवतो आहे. तिनेही त्याच्यासोबत नाटक करायला सुरुवात केली. तिनेही त्याचीच ट्रिक त्याच्यावर उलटवण्याचा निर्णय घेतला. तिने तो बनावट ट्रँझॅक्शन SMS कॉपी केला. त्यावरील रक्कम एडिट करून 18,000 रुपये केले. तोच SMS तिने त्याला परत पाठवला आणि त्याला सांगितले की तिने 18,000 रुपये परत पाठवले आहेत.मुलगी त्याला म्हणाली, “लिजिये अंकल आपको भी चला गया ₹18,000. (घ्या अंकल, मीपण तुम्हाला 18,000 रुपये पाठवले).जेव्हा त्या माणसाला समजले की चोरावर मोर झाला आहे, तेव्हा तो म्हणाला, “मान गया मैं आपको, बेटा (मी तुला मानले, बेटा).असं बोलून त्याने फोन कट केला.

या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. लोकांनी त्या मुलीची खूप प्रशंसा केली आहे. एका यूजरने कमेंट केली, तू खूप चातुर्य दाखवलं आहेस आणखी एकाने लिहिले, ही खूपच हुशार मुलगी आहे. तिचा IQ खूप जास्त आहे.
आजकाल लोकांकडून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येकाने खूप सावध राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी.