अकोला दिव्य न्यूज : तब्बल ३७ वर्षांनी आणि शाळेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंडगाव येथे शेकडो माजी विद्यार्थ्यांनी नवीन उमेद, नव्या उत्साहाने आणि सलामत रहे दोस्तांना हमारा.. म्हणत ‘जल्लोष मैत्रीचा’ साजरा केला. मुंडगाव येथील श्रीमती राधाबाई गणगणे विद्यालयात १९८७ ला इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी ३७ वर्षांनी पुन्हा एकत्रितपणे शाळेच्या वेळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या सर्वांना एकत्र आणण्याचे काम मुंडगाव येथील गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी विजय ढोरे यांनी केले. विजय ढोरे यांनी पुढाकार घेऊन आपल्या वर्ग मित्रांच्या सहकार्याने सोबत शिकत असणाऱ्या ७५ वर्गमित्र मैत्रिणींशी संपर्क केला. सोशल मीडियावर व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करून गेट-टुगेदर कार्यक्रमाला एक मूर्त रूप दिले.

स्नेहसंमेलन कार्यक्रम हा पादुका संस्थानच्या श्री झामसिंग महाराज सभागृह व राधाबाई गणगणे विद्यालयात येथे संयुक्तरित्या पार पडला.
या स्नेहसंमेलन कार्यक्रमाकरिता वर्गमित्र मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रथम श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व विद्यार्थी कार्यक्रम स्थळावर पोहोचले. मित्र-मैत्रिणींचे स्थानिक मित्रांनी जल्लोषात स्वागत केले. सर्वांनी आकर्षक फेटे बांधून गुरुजनांचे आदराने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.अल्पोपहार व चहापाणी झाल्यावर कार्यक्रमाच्या प्रथम सत्राला सुरुवात झाली. प्रथम दिप प्रज्वलन व सरस्वती माता, श्री गजानन महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या आवारातील क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व स्वर्गीय भाऊसाहेब अंबडकार यांच्या पुतळ्यांना हारार्पण व पूजन केले.

गेट-टुगेदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ तायडे होते. सोबतच विनोद शेंडे, तुळशीराम वानखडे, नंदकिशोर नावकार, निळकंठ पाचकोर, कमलाकर फुकट, सुधाकर तायडे,राधाबाई गणगणे विद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर अंबळकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी कमलाकर वलवले, निशिकांत पिंपळे, वामनराव सरकटे, सुरेश गवई उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांकडून शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी अनिल पिंपळे तर प्रास्ताविक विजय ढोरे यांनी केले. यावेळी वानखडे, शेंडे व फुकट यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले. दररोज स्वत:चा आरोग्याकरीता एक तास तरी द्या. असा मुलमंत्र शेंडे यांनी दिला. माजी विद्यार्थी संतोष फुरसुले यांनी दिवंगत वर्ग मित्रांना आपल्या गीतातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, यावेळी वातावरण भावुक झाले होते. यावेळी माजी विद्यार्थी निलेश शेंडे, (सह. दुय्यम निबंधक,अकोला) व इतर विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन शुभांगी म्हैसने गावंडे हिने केले.
त्यानंतर सर्वांनी मिष्ठांन्र भोजनाचा आस्वाद घेतल्यावर दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली.,यात सर्व वर्ग मित्र मैत्रिणींनी आपला परिचय दिला. या मध्ये काही सधन शेतकरी, गृहिणी, शिक्षक, शिक्षिका, व्यावसायिक, समाजसेवक तसेच इतर क्षेत्रात कार्यरत आहेत यामधील काही मित्रांनी कविता, गीत गायन, शाळेमधील धमाल, जुन्या आठवणी, गमती जमती सांगितल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
यावेळी दरवर्षी नियमित स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येण्याचे सर्वानुमते ठरले. संध्याकाळी सर्व वर्गमित्र मैत्रिणींनी या अविस्मरणीय आठवणींची शिदोरी घेऊन जड अंतकरणाने निरोप घेतला.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डॉ.राजेंद्र नाथे, संजय जोत, श्याम आसोले, प्रवीण बिंड, श्रीकृष्ण फुसे, गणेश ढोले, शुभांगी गावंडे, सुचिता वांगे, निश्चला सोनटक्के, सविता धांडे, रंजन तायडे,छाया चौधरी, बबीता महानकर, अनिल पिंपळे, भास्कर वलवले, अरविंद वसु, संगीता वानखडे, गोविंद ठाकरे, निलेश शेंडे, संतोष फुरसुंले, प्रमोद गाडगे, अरुण खलोकार, अजबराव खराटे, हरिदास देवर, विजय ढोरे,राम आसोले, विनोद कपले,विनायक बोदडेसह प्रत्येक व मित्रांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाला श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे विश्वस्त मंडळ, कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चौकट
अशा गेट-टुगेदर कार्यक्रमामुळे जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला सर्वांना भेटून अतिशय आनंद झाला प्रत्येकाने आपल्या कार्यात व्यस्त राहून सोबत मित्रांना भेटत राहिल्यास प्रकृती पण स्वस्थ राहील आणि जीवन पण मस्त होईल असे मनोगत निलेश शेंडे माजी विद्यार्थी ( सह. दुय्यम निबंधक अकोला ) यांनी यावेळी केले.