अकोला दिव्य न्यूज : प्लास्टिकच्या पिशव्या जनावरांच्या मृत्यूचे कारण ठरत असल्याने त्यांचा वापर थांबवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, वझे परिवार व निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीम जयंती व अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

जठारपेठेतील अभिरुची गार्डन येथे आयोजित या भव्य उपक्रमात ११ गोरगरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यासोबतच कापडी पिशव्या तयार करण्यासाठी लागणारे कापड, धागा आणि आगाऊ मजुरी देण्यात आली. या महिलांकडून ५० हजार कापडी पिशव्या तयार करून नागरिकांना मोफत वाटप केली जाणार असून, एका पिशवीला ३ रुपये ५० पैसे मजुरी निश्चित करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना हारार्पण व मेणबत्ती प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त डॉ.सुनील लहाने, कर अधिक्षक विजय पारतवार, अतुल पाटील, विनोद देव, निलेश देव, जयंत सरदेशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमात विशेष सहभागी व मोलाचा वाटा उचलणारे सौ.रश्मी देव, सौ.सीमा सरदेशपांडे, सौ.मेघा देशमुख, प्रा.प्रेरणा पवार, विश्वनाथ डांगे, कैलास तिरपुडे, राहुल तिरपुडे, सुधीर मेश्राम, नरेंद्र परदेशी, सुधीर मस्के, शैलेश देव यांच्यासह नीलेश देव मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक नीलेश देव तर आभार प्रदर्शन जयंत सरदेशपांडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेशराव मैराळ, राजू कनोजिया, अजय शास्त्री, अंवतिका मैराळ, डॉ. स्नेहा गोखले, नीलेश पवार, नीलेश दुधलम, विजय वाघ आदींनी परिश्रम घेतले.
एक हात मदतीचा.–बेरोजगार युवकाला इलेक्ट्रिक ऑटो कार्यक्रमात बेरोजगार युवक नीलेश दुधलम याला इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा प्रदान करण्यात आली. हा उपक्रम मित्र मंडळाच्या वर्गणी व बँक सहय्याच्या माध्यमातून साकार झाला. वाहनाच्या चाव्या डॉ. लहाने यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.