अकोला दिव्य न्यूज : तेलुगू जातीचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात समावेश करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालून केंद्र सरकारकडे ही मागणी मान्य होईपर्यंत पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिले.

राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर अकोल्यात आले असता, अखिल भारतीय तेलुगू फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन तेलुगू जातीचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात समावेश करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती दिली. तेलुगू जातीचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गात समावेश करण्यासाठी केंद्राकडे मागणी वजा विनंती करण्यात आली आहे. परंतु अद्याप या संदर्भात कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.
चर्चे दरम्यान यापुर्वीही मुंबईत त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीची आठवण करून देताना या संदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचेही सांगितले. सर्व काही ऐकल्यानंतर मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

चर्चेत अखिल भारतीय तेलुगू महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश अण्णा मिरजामले तसेच महासंघाचे पदाधिकारी मनोज गणकर, नंदू साबळेकर, गणेश भंडारी, रवी संगेकरसोबत इतरही पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.