अकोला दिव्य न्यूज : नशीब कधी आणि कोणामुळे फळाला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. एका शेतकऱ्याला एका झाडाने रातोरात करोडपती केलं. ही बाब कोणालाही पचनी पडणार नाही, पण हे सत्य आहे. पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. यांच्या ७ एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. २०१३-१४ पर्यंत हे झाड कसलं आहे? हे शिंदे कुटुंबाला माहितच नव्हतं. २०१३-१४ मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीने संपूर्ण कुटुंब हैराण झालं.

नेमकं काय घडलं?
कर्नाटकातून रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी हे झाड रक्त चंदनाचं असल्याचं सांगत त्याचं मूल्यही समजावून सांगितलं. त्यावेळी शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केलं, मात्र या झाडाचं मूल्य देण्याची टाळाटाळ करत होते. त्यामुळे यवतमाळमधील कुटुंबाने या झाडाचं खाजगीमधून मूल्यांकन काढलं. त्यावेळी त्याचं मूल्यांकन होतं ४ कोटी ९७ लाख रुपये. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या कुटुंबाने न्यायालय गाठलं.

न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितले असून ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे कुटुंबाला देण्यात आली आहे. सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खाजगी अभियंत्याकडून रक्त चंदनाच्या झाडाचं मूल्यांकन काढलं. मात्र ते जास्त असल्याने रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर कुटुंबाने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केलं.

शंभर वर्षे जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे एक कोटी रुपयाची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आली. सध्या त्यातील ५० लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसंच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचं मूल्यांकन करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहे.

वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी शिंदे यांची शेतजमीन संपादित करण्यात आली असून मूल्यांकनानंतर उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळेल या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेतून ८ फेब्रुवारी २०१८ रोजी पारित केलेला मोबदला रद्द करावा आणि लाल चंदनाचं वृक्ष आणि इतर वृक्ष याबाबतचे आदेश गेल्या सुनावणीत दिले होते. त्यानंतर आता एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयाला दिली.
