अकोला दिव्य न्यूज : सध्याच्या परिस्थितीत विवाहयोग्य मुलांसाठी मुलगी शोधणं महाकठीण काम झाले असून, या अडचणीचा कांहीं कडून अनुचित लाभ घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.एका युवकाशी विवाहबद्ध झालेल्या या नववधूने कुटुंबीयांना रात्री जेवणामध्ये गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने, घरातील रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी नाशिक येथील एजंट राजू जैन याला गाठत विश्वासात घेतले. जैन याच्या माध्यामातून पोलिसांनी सापळा रचून अखेर संशयित नववधूला अटक केली. नाशिक येथील साहेबराव हिरामण शिंदे व त्याची बहीण सुरेखा हिलाल कडवे (रा. नाशिक) यांनी या विवाहापोटी एक लाख दहा हजार रुपये घेतले होते. दुसरा एजंट राजू जैन याने ११ हजार रुपये घेतले होते.

उर्वरित एक लाख तीस हजार रुपये लीना बालाजी मंदाळे (रा. रांजणगाव एमआयडीसी, संभाजीनगर) हिने घेतले होते. लखमापूर येथील कुटुंबीयांना खोटी माहिती पुरविण्यात आली होती.

संबंधित नववधू ही नांदेड किंवा दिल्लीची असल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. परंतु, ती येथील नसून, संभाजीनगरजवळील रांजणगाव एमआयडीसीत राहत असल्याचे तपासात उघडकीस आले.

अशी झाली कारवाई
राजू जैन या एजंटने संशयित लीना बालाजी मंदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना घोटीचे एक स्थळ शोधले आहे, असा बनाव केला. राजू जैन याने एका घरात जाऊन व्हिडीओ कॉल करून हे घर असल्याचे पटवून दिले. तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे संबंधितांनी तातडीने होकार देत येण्याची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे लीना बालाजी मंदाळे, तिचा मामा आनंदा परसराम दळवी, मावशी काशीबाई किशन वाघमारे हे सर्व घोटी येथे पोहोचले.

त्यापूर्वीच घोटी व सटाणा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तिथे सापळा लावला होता. त्यात सर्व संशयित अलगद अडकले. रात्री साडेनऊ वाजता संशयितांना सटाणा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सटाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पवार, उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, हवालदार अजित देवरे, समाधान कदम, महिला पोलिस कावळे, पोलिस मित्र बाला धामणे व घोटी पोलिसांनी ही कारवाई केली.
