Tuesday, April 15, 2025
HomeUncategorizedनागपूर : जोरदार स्फोटात ११ कामगार गंभीर जखमी !तिघांचा शोध लागला नाही

नागपूर : जोरदार स्फोटात ११ कामगार गंभीर जखमी !तिघांचा शोध लागला नाही

अकोला दिव्य न्यूज : उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत काल शुक्रवारी मोठा स्फोट होऊन ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहेत. यासोबत तीन कामगारांचा मध्यरात्रीनंतरही शोध लागलेला नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांनी दुजोरा दिला. मध्यरात्री १ वाजतानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सायंकाळी ६ वाजता कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. रात्री उशिरा सर्वच जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले.

उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. शुक्रवारी या कंपनीत जोराचा स्फोट झाला.कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फाॅइलला पॉलिश करण्याचे काम ज्या मशीनमध्ये केले जाते, ती मशीन हाताळत असताना, कंपनीत अचानक स्फोट झाला.

घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, उमरेडचे ठाणेदार धनाजी जळक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकांना पाचारण करून स्फोटातील जखमी कामगारांना बाहेर काढत उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये रवाना केले. दरम्यान, नागपूर महापालिकेच्या लकडगंज आणि सक्करदरा झोनमधील दोन अग्निशमन वाहने आणि सात जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले.

१५० कामगार बचावले : या कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान, कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.

कंपनीत चार युनिट
या कंपनीत चार युनिट आहेत. स्फोट ज्या ठिकाणी झाला तिथे २२ कामगार कर्तव्यावर होते, अशी माहिती आहे. विनोद खंडेलवाल या कंपनीचे संचालक तर ललित भंडारी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!