Sunday, April 13, 2025
HomeUncategorizedनवा उच्चांक ! सोनं लाखाच्या घरात ? एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6...

नवा उच्चांक ! सोनं लाखाच्या घरात ? एकाच दिवसात सोन्याच्या दरात 6 हजार रुपयांची वाढ

अकोला दिव्य न्यूज : अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किंमतीने सर्व विक्रम मोडले असून आज कामकाजाच्या अखेरच्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ६,२५० रुपयांनी वाढून ९६,४५० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. सोन्याच्या भावाने हा नवीन उच्चांक गाठला असून, सोनं लाखाच्या घरात प्रवेश करण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा मजबूत पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. यामुळे देशांतर्गत किमती वाढल्याचं त्यांनी नमूद केलं. बुधवारी ९९.९ टक्के शुद्धतेच सोनं ९०,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.

सतत चार दिवसांच्या प्रचंड घसरणीनंतर ९९.५ टक्के शुद्धतेचं सोनं ६,२५० रुपयांनी वधारलं आणि ९६ हजार रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांकी स्तर ओलांडला. मागील सत्रात सोन्याचा भाव ८९,७५० रुपये प्रति १० ग्रॅम वर बंद झाला होता.

चांदीच्या दरात वाढ : जागतिक ट्रेंडनुसार चांदीचा भावही २,३०० रुपयांनी वधारून ९५,५०० रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. मागील सत्रात चांदी ९३,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी सराफा बाजार बंद होते.कॉमेक्स सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. कारण अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय समजल्या जाणाऱ्या सोन्याची वाढती मागणी आहे. यापूर्वी २ एप्रिल रोजी दर ३२०० डॉलर प्रति औंसच्या पुढे गेले होते, पण नंतर नफावसुलीमुळे ते खाली आले.

गुरुवारी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चिनी वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत शुल्क लावलं होतं, ज्याला चीननं प्रत्युत्तर देत १२५ टक्क्यांपर्यंत शुल्क लावलं. शुल्क युद्धाची वाढती चिंता आणि जागतिक आर्थिक मंदीच्या भीतीमुळे अमेरिकी डॉलर निर्देशांक १०० अंकांच्या खाली घसरला, असे चैनवाला यांनी सांगितलं.

यामुळे सराफा भावाला आणखी आधार मिळाला : इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी यूबीएसच्या मते, व्यापार आणि आर्थिक अनिश्चितता, महागाईची भीती, मंदीचा धोका आणि भूराजकीय तणाव यासारख्या वित्तीय बाजारात सुरू असलेल्या चिंतांमुळे सोन्याचं आकर्षण वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!