अकोला दिव्य न्यूज : केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या खासदार औद्योगिक महोत्सव संकल्पनेतून, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित ‘अँडव्हान्टेज विदर्भ’ च्यामाध्यमातून विदर्भाचा सर्वांगिण विकास आणि उद्योगांना नवी दिशा देण्यात मोठे यश मिळाले. या दिमाखदार सोहळ्यात योगदान देणाऱ्या प्रमुख संस्था आणि व्यक्तींचा गौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार अनिल बोंडे, माजी खासदार अजय संचेती, ॲडव्हांटेज विदर्भ कमिटीचे अध्यक्ष आशिष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, सचिव विजय शर्मा उपस्थित होते.

‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ साठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अकोल्याचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ साठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान केवळ निकेश गुप्ता यांचा नव्हे तर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेचा असून, ही बाब संपूर्ण अकोला विभागासाठी अभिमानास्पद आहे. या यशाबद्दल चेंबरचे पदाधिकारी आणि सदस्य व नागरिकांकडून विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अभिनंदन करण्यात येत आहे.