अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरालगत असलेल्या मोठी उमरी येथील ग्रामपंचायत समोर एका चार चाकी कारने दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता चारचाकी वाहन चालकाने धडकेनंतर दुचाकीस्वाराला काही अंतरावर चक्क फरफटत नेऊन पुढे दुचाकी वाहन लहान उमरी येथील नाक्यापर्यंत घासत आणली. लोकांनी पाठलाग केला तेव्हा चारचाकी चालकाने तेथून पळ काढला.या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीला धडक देणा-या कारवर पोलिस विभागाचे चिन्ह असलेले स्टिकर आहे.

या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून अपघाताचा थरार बघायला मिळाला आहे. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार चालकाचे नाव विजय बाळूसिंग सोळंके आहे.सविस्तर घटना अशी की, दुचाकीस्वार गोपाल नागे एसटी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. मोठी उमरी येथील ग्रामपंचायत जवळील दुध डेअरीमधून साहित्य घेऊन ते दुचाकीने जात असताना, अचानक मागून एम एच 28 DK 2735 या क्रमांकाचा चार चाकी कारने दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली.

या धडकेत एच 30 w 5850 या क्रमाकाचा दुचाकीला चालकासह काही अंतरावर कार चालकाने फरफटत नेले. दुचाकीस्वार गोपाल नागे रस्त्याच्या कडेला खाली पडले. परंतु, कार चालक इथेच थांबला नाही. पुढे लहान उमरी येथील नाक्यापर्यंत ही दुचाकी चक्क घासत नेली.

उमरी परिसरामध्ये रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी ही दुचाकी फरफटत नेताना प्रत्यक्ष बघितल्यामुळे नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु कार चालक तेथून पळ काढण्यात यशस्वी झाला. संतप्त नागरिकांनी यावेळी कारची तोडफोड केली.

दरम्यान, सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणून कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. कार चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.

चारचाकी गाडीवर पोलिसाचे चिन्ह असलेले स्टिकर : ज्या चारचाकी गाडीने दुचाकीला उडवले त्या चारचाकी कारवर पोलीस विभागाचे चिन्ह लावलेले आहे. कार चालक हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा आहे. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याच्या कारवर पोलिसाचे चिन्ह लागले आहे. नियमाने बघितले तर अश्याप्रकारे पोलिसाचे चिन्ह लावणे गुन्हा आहे. यावर कारवाई करेल कोण? हाच मोठा प्रश्न आहे. विजय बाळूसिंग सोळंकेला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
